दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची संगमनेरमध्ये बैठक / बिनविरोध निवडणुकीवर एकमत
माय नगर वेब टीम -
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी संगमनेर येथे कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर आयोजित बैठकीसाठी उपस्थित होते. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर जपलेली सहकाराची आणि राजकारणविरहित वाटचाल लक्षात घेता, बँकेची निवडणूक टाळून ती बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील काही बड्या व्यक्तींना या बैठकीबाबत काहीही माहित नसल्याचे स्टेटमेंट समोर आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही जिल्ह्यातील समविचारी मंडळींनी अनेकवेळा जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शविला. जी नेतेमंडळी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, तसेच ज्यांच्यासोबत संपर्क झाला नाही, त्या सर्वांशी समन्वय साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न राहील, असं जिल्हा बँक निवडणूक समितीने म्हटलं आहे.
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येऊन अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक आणि सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करावे, हीच बैठकीची सामूहिक भूमिका असल्याचे जिल्हा बँक निवडणूक समिती वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे न्यावे, तसेच बँकेची प्रगती आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी, या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीला हे नेते होते उपस्थित
या बैठकीस माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.
आत्मकेंद्री राजकारण केल्यास बिनविरोध अशक्य; सभापती राम शिंदे यांचा इशारा
जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील क्रमांक एकची बँक आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बँक निवडणूक बिनविरोध करण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे बिनविरोधचे वारे वाहत आहेत. मात्र, जर कोणी आत्मकेंद्री आणि स्वतःचाच विचार करून राजकारण करत असेल तर मात्र जिल्हा बँक बिनविरोध होणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता दिला आहे. तालुक्यातील निमगाव डाकू येथील धकोजी महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये आज पंडित दीनदयाल स्पर्श योजनेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या विशेष पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, नगराध्यक्ष छाया सुनील शेलार, अशोक खेडकर, गटनेते प्रा. सतीश पाटील, सुनील यादव, शेखर खरमरे, रमेश अनभूले, राजेंद्र भोसले, स्वप्निल तोरडमल उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवार (ता. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 5 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. बँकेच्या 21 मतदारसंघांसाठी 2 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी बँकेचे सभागृह हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय राहणार आहे. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राहुरीचे सहायक निबंधक रावसाहेब खेडकर आणि नेवासेचे सहायक निबंधक देविदास घोडेचोर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला आहे. 6 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 7 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमातील सर्व टप्प्यांसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृतीसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
21 मतदारसंघांसाठी एकाच ठिकाणी अर्ज प्रक्रिया
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय हेच उमेदवारी अर्जांच्या विक्री आणि स्वीकृतीचे केंद्र राहणार आहे. इच्छुक उमेदवारांना याच ठिकाणाहून संबंधित मतदारसंघाचा अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह तो दाखल करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम
28 सप्टेंबर: उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
5 ऑक्टोबर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
6 ऑक्टोबर: उमेदवारी अर्जांची छाननी
7 ते 21 ऑक्टोबर: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
2 नोव्हेंबर: मतदान
3 नोव्हेंबर: मतमोजणी
Post a Comment