पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम



माय नगर वेब टीम 

मुंबई : 2026 च्या आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका पाहायला मिळत आहे. सोमवारी 28 सप्टेंबर रोजी झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने आपली सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तर दुसरीकडे महिला धावपटू विथ्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. विथ्याने भारताच्या दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा तब्बल 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत क्रीडा जगताला थक्क केले आहे.



विथ्या आणि गुलवीर यांच्या या धमाकेदार कामगिरीमुळे आशियाई खेळांमधील भारताच्या पदकांची संख्या आता 40 च्या पार पोहोचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने अवघ्या 54.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) कामगिरी ठरली. या कामगिरीसह तिने 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये पीटी उषा यांनी नोंदवलेला 55.42 सेकंदांचा 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा केला. आता हा राष्ट्रीय विक्रम अधिकृतपणे विथ्या रामराजच्या नावावर नोंदवला गेला आहे.

या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मरियम करीमने 54.31 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर कझाकस्तानच्या एडेलिना जेम्सने 54.58 सेकंद वेळ घेत रौप्यपदकावर कब्जा केला. चालू आशियाई खेळांमधील विथ्या रामराजचे हे दुसरे पदक आहे. याआधी तिने 4x400 मीटर मिक्स रिले संघात रौप्यपदक जिंकले होते.

गुलवीर सिंगचा 'सिल्वर' धमाका

पुरुषांच्या 1500 मीटर रेसमध्ये गुलवीर सिंगने 3:36.72 मिनिटांत शर्यत पूर्ण करून आपले वैयक्तिक सर्वोत्तम टायमिंग नोंदवले आणि रौप्यपदक मिळवले. या शर्यतीत जपानच्या कजुतो इइजावाने 3:36.35 मिनिटांत रेस पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्याच नागिया मोरीने 3:37.92 मिनिटांच्या वेळेसह कांस्यपदक मिळवले. गुलवीर सिंगचे या आशियाई खेळांमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारी त्याने पुरुषांच्या 10000 मीटर रेसमध्ये 28:29.38 मिनिटांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले होते.

भारतीय अ‍ॅथलीट्सच्या या दमदार कामगिरीमुळे आशियाई खेळ 2026 मधील भारताच्या एकूण पदकांची संख्या 41 वर पोहोचली आहे. यामध्ये भारताने आतापर्यंत 4 सुवर्णपदकांसह (Gold Medals) अनेक रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. या कामगिरीसह भारत सध्या मेडल गुणतालिकेमध्ये 12व्या स्थानावर विराजमान आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post