शेतकऱ्यांची पिळवणूक ; वरिष्ठ पातळीवरून चौकशीची मागणी
माय नगर वेब टीम
श्रीगोंदा : जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे कार्यालय म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट तसेच पिळवणूक होत असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी केला आहे. बाबासाहेब जगताप यांच्या आरोपामुळे श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालय चर्चेत आले आहे.
याबाबत बाबासाहेब जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत विविध आरोप केले आहेत. जमिनीचे व्हॅल्युएशन काढताना तसेच विविध दस्त नोंदणीच्या प्रक्रियेत सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था अथवा अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते. कर्जासाठी अनेकदा संबंधित जमिनीचे मूल्यांकन आवश्यक असते. याच प्रक्रियेत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. त्यामुळे कर्जासाठी कार्यालयाच्या पायऱ्या चढणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक आर्थिक अडचण निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहार तसेच विविध प्रकारच्या स्थावर मालमत्ता व्यवहारांशी संबंधित दस्तांची नोंदणी केली जाते. खरेदीखत, बक्षीसपत्र, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, गहाणखत, भाडेपट्टा, मुखत्यारपत्र, करारनामे तसेच अन्य मालमत्ता व्यवहारांशी संबंधित दस्त नोंदणीच्या प्रक्रियेत येतात.
शेतकरी कर्जासाठी जमीन तारण ठेवण्याच्या तयारीत असताना संबंधित जमिनीचे मूल्यांकन आवश्यक ठरते. अशावेळी मूल्यांकनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जाते असा आरोप जगताप यांनी पत्रकात केला आहे. अनेक शेतकरी याचे बळी ठरले असल्याचेही सांगण्यात येत आहे. गुंठेवारी खरेदीबाबत ही आर्थिक लुट होत आहे. श्रीगोंदा दुय्यम निबंध कार्यालयातील सावळ्या गोंधळाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी बाबासाहेब जगताप यांनी केली आहे.
महसूल मंत्र्यांना भेटणार !
दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत अनेक तक्रारी आहेत. येथील सावळ्या गोंधळाबाबतच्या पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकारी तसेच महसूलमंत्र्यांकडे लवकरच तक्रार करण्यात येणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणे दुर्दैवाची बाब आहे.
बाबासाहेब जगताप (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा)

Post a Comment