गुंजाळेकरांची ४२ वर्षांची भक्तीची अखंड ज्योत; हरिनाम सप्ताहातून आध्यात्मिक जागर



गुंजाळेकरांची ४२ वर्षांची भक्तीची अखंड ज्योत; हरिनाम सप्ताहातून आध्यात्मिक जागर

अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ; ज्ञानदानाचा सोहळा

माय नगर वेब टीम 

नगर तालुका : नगर, नेवासा आणि राहुरी तालुक्यांच्या सीमेवर वसलेले गुंजाळे गाव धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोप्यासाठी ओळखले जाते. गावाने जपलेली अखंड हरिनाम सप्ताहाची ४२ वर्षांची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून नव्हे तर गावातील नव्या पिढीला संतविचार, अध्यात्म आणि संस्कारांची जोड देणारा उपक्रम म्हणून या सप्ताहाकडे पाहिले जाते. 

      श्रीक्षेत्र गुंजाळे येथील हनुमान मंदिरात गुरुवार (दि. १३)  ते गुरुवार ( दि. २० ऑगस्ट) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाला यंदा ४२ वर्षे पूर्ण होत असून वर्षानुवर्षे ग्रामस्थांनी जपलेली ही धार्मिक परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात आहे.

  ह.भ.प. महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (देवगड) यांच्या अधिपत्याखाली तसेच ह.भ.प. महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, ह.भ.प. राम महाराज पोते, ह.भ.प. तुकाराम महाराज केसभट आणि ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे यांच्या मार्गदर्शनाने ज्ञानदानाचा सोहळा होत आहे. सप्ताहात दररोज पहाटे काकडा, सकाळी विष्णुसहस्रनाम व ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तनकारांची कीर्तनसेवा असा धार्मिक कार्यक्रम राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर गुंजाळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

गुरुवार दि. १३ रोजी ह.भ.प. गजानन महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात होईल. त्यानंतर दररोज ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम, ह.भ.प. ईश्वर महाराज कदम, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील तर ह.भ.प. मधुकर महाराज सायाळस्कर यांची कीर्तनसेवा होणार आहे.

   गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज केसभट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह दरम्यान ह.भ.प. लक्ष्मण महाराज नांगरे सदिच्छा भेट देणार आहेत. सप्ताह तसेच होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गुंजाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

गावाच्या एकोप्याचीही परंपरा !

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळेकर एकत्र येतात. सप्ताहाच्या आयोजनामागे ग्रामस्थांचा सहभाग, श्रमदान आणि धार्मिक भावनेसोबतच सामाजिक एकोपा जपण्याची भावना आहे. त्यामुळे ४२ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा केवळ एका वर्षातून येणारा धार्मिक सोहळा न राहता गावाच्या संस्कारांची आणि एकजुटीची ओळख बनली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post