मावा बनविणाऱ्या अड्ड्यावर पुन्हा पोलिसांची धाड; १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरातील ससेवाडी रोडवर सुगंधीत तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. १२) धाड टाकून तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी सुमारे महिनाभरापूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मावा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात अवैध व्यवसायांची माहिती घेत असताना ससेवाडी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये मावा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी सुगंधीत तंबाखू आणि सुपारी एकत्र करून मावा तयार करत असलेला बबल बापू ससे (वय २३, रा. आठरे वस्ती, ससेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत ३० हजार रुपये किमतीचा १५ किलो तयार मावा, ६३ हजार रुपये किमतीचा ९० किलो सुपारीचा चुरा, १५ हजार रुपये किमतीची १५ किलो सुगंधीत तंबाखू आणि ३५ हजार रुपये किमतीची १७.५० किलो सुगंधीत तंबाखू, असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली असता, जप्त केलेला मुद्देमाल हा शशिकांत रामदास मगर (रा. मगर वस्ती, ससेवाडी रोड, जेऊर बायजाबाई) याच्या मालकीचा असल्याचे तसेच तो छत्रपती संभाजीनगर येथील जितु मालपाणी( पुर्ण नाव माहीत नाही) याने पुरविल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघेही फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार विजय ठोंबरे, अतुल लोटके, संदीप पवार, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सागर ससाणे, योगेश कर्डिले, दीपक जाधव व अमृत आढाव यांच्या पथकाने केली.

Post a Comment