कुत्र्याची शिकार, वासरावर हल्ला ; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
बंदोबस्त करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांची मागणी
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज बिबट्याचे दर्शन होत असून कुत्र्याची शिकार तसेच वासरावर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बनपिंप्री परिसरातील रानवस्ती तसेच मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, शेतमजूर आणि शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना भीतीचा सामना करावा लागत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे काही शालेय विद्यार्थीही भीतीच्या वातावरणात शाळेत जाताना दिसत आहेत.
दिवसेंदिवस बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वाढलेला वावर पाहता भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी केली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन !
बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याची छेड काढण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. पशुधन शक्यतो सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावे. सर्व नागरिकांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
– बाबासाहेब जगताप,
(संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती )
बिबट्याची शिकार करण्याची वेळ ही शक्यतो सायंकाळी व पहाटे ची असल्याने यावेळी नागरिकांनी, शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शेतात काम करताना खाली वाकून अथवा बसून काम करू नये. बिबट्या शक्यतो आपल्या उंचीपेक्षा जास्त उंची असणाऱ्या प्राण्यांची शिकार करत नाही. याबाबत वन विभागाकडून जनजागृती करण्याची ही गरज आहे.


Post a Comment