कर्जमाफीने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शेतकर्‍यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, कर्जमाफी देण्यात आली. मात्र, तरीही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच मुस्लिम आरक्षणासंदर्भात काय भूमिका घ्यावी, याबाबत शिवसेनेमध्ये गोंधळ आहे. एका बाजूला विचारधारा सांभाळायची व दुसर्‍या बाजूला सत्ता, अशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगर येथे केली.

पाथर्डी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला भेट देऊन आल्यानंतर नगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, श्यामराव पिंपळे, संभाजी दहातोंडे उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते ना. दरेकर म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍याने डोक्यावर कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली. ही घटना महाराष्ट्राला लाजवणारी आहे.

जर सरकारने सरसकट कर्जमाफी दिली असती, तर ही आत्महत्या झाली नसती. सरसकट कर्जमाफी करा हे आम्ही अनेक वेळेला ओरडून सांगत होतो. सरसकट कर्जमाफीमध्ये या शेतकर्‍याचे नाव असते, तर त्याचे देखील कर्ज माफ झाले असते. दोन लाखांच्यापेक्षा जास्त असल्यामुळे बटुळे यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत येऊ शकले नाही. दोन लाखांच्या पुढे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचे सातबारा कोरा करू, असे तिनही पक्षाने सांगितले होते. मात्र, अजून देखील शेतकर्‍यांचे सातबारे कोरे झालेले नाहीत.

दरम्यान, सर्व राजकीय पक्ष कर्जमाफी देतात, अशी विचारणा केली असता आ. दरेकर म्हणाले, शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन ही त्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, हे सिद्ध झालेले आहे. वास्तवतः शेतकर्‍यांना शेतीसाठी काय साधनसामुग्री देता येतील. त्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, मात्र योजना देऊनही आत्महत्या थांबत नाही, असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post