पारनेरात ८ व ९ मार्च रोजी भव्य ‘महाआरोग्ययज्ञ’ ;खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
माय नगर वेब टीम
पारनेर : पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे ८ व ९ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ‘महाआरोग्ययज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या महाआरोग्य शिबिरात राज्यातील नामांकित रुग्णालयांतील एम.डी., एम.एस., डी.एन.बी. तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी, निदान व आवश्यक शस्त्रक्रिया करणार आहेत. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, भगंदर, गाठींची तपासणी, ईसीजी, नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १२ वर्षांपर्यंतच्या हृदयरोगग्रस्त बालकांची मोफत शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा विकार, त्वचारोग, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, दंतरोग, आयुर्वेद-नॅचरोपॅथी उपचार तसेच पॅरालिसिस रुग्णांचे पुनर्वसन यांचा समावेश आहे.
शिबिरातील सर्व तपासण्या व उपचार पूर्णपणे मोफत असतील. सहभागी रुग्णांसाठी भोजन व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. निदान झालेल्या रुग्णांवर पुढील सहा महिने सातत्याने उपचार व फॉलोअप करण्यात येणार असून त्याचा आढावा प्रतिष्ठानमार्फत घेतला जाईल.
शिबिराचे उद्घाटन ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment