*पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वंकष नियोजन करा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पारनेर शहर व लगतच्या गावांना सुपा एमआयडीसीमधून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल. 80 ते 90 टक्के पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच चारा व पाणीटंचाईबाबत आढावा व नियोजन बैठक पारनेर येथे झाली. यावेळी आमदार काशिनाथ दाते, प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, नगराध्यक्षा विद्याताई कावरे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*पाणीपुरवठा योजनांना गती*
बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा, चारा, शेतीचे नुकसान आणि रोजगाराच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना नागरिक, शेती आणि पशुधनाच्या गरजा लक्षात घेऊन समन्वयाने उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या ‘हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन त्यांना गती द्यावी. अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुपा पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत जोडणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे. जातेगाव येथे आवश्यक असलेले सिंगल फेज रोहित्र तातडीने उपलब्ध करून द्यावे. टाकळी ढोकेश्वर येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिकांशी चर्चा करून समस्या सोडवाव्यात. पळे बुद्रुक येथे रोहित्र बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
*पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई
सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणी दूषित करणाऱ्या कारखाने व औद्योगिक आस्थापनांची एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
*शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन
दुष्काळ तसेच शेतीच्या नुकसानीच्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेती नुकसानीचे पंचनामे विहित वेळेत पूर्ण करून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
कुकडी चारीच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांचा समन्वय साधून परिपूर्ण दुष्काळ निवारण आराखडा तयार करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
*पशुधनासाठी चारा, नागरिकांना रोजगार
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांचे स्थलांतर होऊ नये यासाठी रोजगाराच्या कामांची संख्या वाढवून स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून द्यावा. दुष्काळाच्या काळात नागरिकांना पाणी आणि हाताला काम उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment