माय नगर वेब टीम
मुंबई : महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, पुणे वेधशाळेने यंदाचा पावसाळा संपल्याची आणि मान्सूनच्या 'एक्झिट'ची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मान्सूनचा मुख्य काळ असलेल्या जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात एकूण ८१ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.
पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "१ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा मुख्य काळ मानला जातो, जो अधिकृतरित्या संपला आहे. राज्यातून पाऊस पूर्णपणे गायब झाला नसला, तरी मान्सूनचा मुख्य हंगाम आता समाप्त झाला आहे."
येत्या २ ते ३ दिवसांत परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. राज्यात सरासरी ८१ टक्के पाऊस झाला असून यामध्ये कोकण विभागात १४ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११ टक्के, विदर्भात २३ टक्के, तर सर्वाधिक तूट मराठवाडा विभागात नोंदवली गेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यात चिंतेचे ढग जमा झाले असून, तेथे तब्बल ४० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
पुढील १ ते २ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ भागात तापमानाचा पारा वाढलेलाच राहील. १ आणि २ ऑक्टोबरनंतर हवामानात कोणतीही नवीन प्रणाली तयार होत नसल्याने कुठेही पावसाची शक्यता नाही. शिवाय, ऑक्टोबर महिन्यात सरासरी तापमानात अंशतः वाढ होते, असेही पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

Post a Comment