स्व.आ.शिवाजीराव कर्डिले सहकाराचा वारसा आता आ. अक्षय कर्डिलेंच्या हाती
शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेतून काम करण्याचा संकल्प; आमदार अक्षय कर्डिले उद्या जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करणार
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, आमदार अक्षय कर्डिले हे उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीकडे केवळ राजकीय निवडणूक म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांशी जोडलेल्या सहकाराच्या माध्यमातून काम करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.
आमदार अक्षय कर्डिले यांचे वडील स्वर्गीय आ शिवाजीराव कर्डिले यांनी यापूर्वी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम केले होते. शेतकरी हा सहकार व्यवस्थेचा केंद्रबिंदू मानत त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकिंग सुविधांबरोबरच विविध योजना आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात संस्थात्मक कर्जाचा आधार मिळावा, शेतीशी संबंधित गरजांसाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी सहकाराच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. याच सहकाराच्या वारशाला पुढे आ अक्षय कर्डिले आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याच्या भूमिकेत पुढे येत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न, पीक कर्जाची उपलब्धता, शेतीसाठी आवश्यक आर्थिक सुविधा, ग्रामीण भागातील सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना संस्थात्मक आधार मिळवून देणे, या मुद्द्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे हाताळण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.
विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहण्याबरोबरच आता सहकार क्षेत्रातही सक्रिय भूमिका घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांची उमेदवारी ही त्यांच्या वडिलांच्या सहकारातील कामाची पुढची पायरी मानली जात आहे.शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी काम करण्याचे आव्हान नव्या संचालकांसमोर असणार आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सहकारातून शेतकऱ्यांशी जोडलेले नाते आणि त्यांचा अनुभव याच पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले यांच्याकडूनही शेतकरी-केंद्रित कामाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment