दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून बिनविरोधसाठी एकत्र येण्याचे आवाहन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची ‘कामधेनू’ म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यात सध्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध होत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. मात्र, व्यक्तीद्वेषातून किंवा एखाद्याला डावलून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, तर ती बिनविरोध होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी खा. नीलेश लंके यांनी गुरुवारी (दि. १) पारनेर सोसायटी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक ही ठरवून करण्यासारखी गोष्ट नसते. वेळप्रसंगी निर्णय घेतले जातात आणि त्यानुसार निवडणुकीला सामोरे जावे लागते. माझ्यासोबत नेहमीच अनेकजण असतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली गर्दी हे शक्तिप्रदर्शन नाही. शक्तिप्रदर्शन करायचे असते तर हजारो लोक आणले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, याबाबत आमचे सर्वांचेच एकमत आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून, निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी प्रमुख मंडळींनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला तर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. परंतु व्यक्तीद्वेषातून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपला विरोध राहील, असे लंके यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक काम करते, तोच शेतकरी सध्या अडचणीत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत संस्थेची निवडणूक लावणे योग्य बाब नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाचा अजेंडा अथवा उमेदवार निश्चित झाला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता अध्यक्षपदाचा निर्णय निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे लंके यांनी सांगितले. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच बिनविरोध निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. निवडून आलेल्या संचालक मंडळात बहुमत कोणाच्या बाजूने आहे, त्यानुसार अध्यक्षाची निवड केली जाते. त्यामुळे आताच अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे, असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री जामखेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करीत असल्याबाबत बोलताना लंके यांनी सरकारकडून दुष्काळग्रस्तांना तातडीने ठोस मदत देण्याची मागणी केली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी झालीच पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली पाहिजे. मात्र, केवळ आश्वासन देऊन भागणार नाही. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. शेतकरी मोठ्या संकटात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, नुकसानग्रस्त भागात सरसकट पंचनामे करावेत, शेतमजुरांनाही मदत द्यावी, तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणीही खा. लंके यांनी केली.

Post a Comment