राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी खर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी खर्चात काटकसर करावी आणि निधी खर्चात २० टक्के कपात करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या निर्णयातून शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांसारख्या महत्त्वाच्या योजनांना वगळण्यात आले आहे.


मुख्यमंत्र्यांनी रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देशही दिले आहेत. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. या योजनेचा निधी सुरळीत ठेवण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मदतीची रक्कम अपुरी असल्याची टीका करत विरोधकांनी त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे.


जागतिक अस्थिरता, आर्थिक मंदी, दुष्काळी परिस्थिती आणि राज्यावरील वाढते कर्ज यामुळे सरकारसमोर आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे खर्चातील कपात आणि शेतकरी मदतीच्या निर्णयांकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post