राज्यसभेचा सस्पेन्स संपला? मविआकडून शरद पवारांचं नाव निश्चित; काय घडलं पहा



माय नगर वेब टीम 

मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र मधील ७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडे ६ तर महाविकास आघाडीकडे १ जागा असल्याचे गणित आहे.

महायुतीमध्ये भाजपला ४, शिवसेना (शिंदे गट) ला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे.

मविआमध्ये शरद पवारांच्या नावावर एकमत?

मविआकडील एकमेव जागेसाठी मागील दोन आठवड्यांपासून जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संख्याबळाच्या आधारावर दावा केला होता. मात्र आता शरद पवार यांच्या नावावर तिन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यसभेसाठी पुन्हा एकदा जाण्याची इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे तसेच दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.

दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडून पाठिंबा मिळाल्यास ठाकरे गटानेही शरद पवार यांच्या नावाला सहमती दर्शवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मविआकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

भाजप आणि शिंदे गटाची उत्सुकता

राज्यसभा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना सर्व पक्षांत उमेदवारीबाबत हालचाली वेगात सुरू आहेत. भारतीय जनता पार्टी ने नुकतीच ६ राज्यांतील ९ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाराष्ट्रातील नावे जाहीर झालेली नाहीत. तसेच शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

३७ जागांसाठी निवडणूक

देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातून निवडल्या जाणार आहेत. तामिळनाडू (६), बिहार आणि पश्चिम बंगाल (प्रत्येकी ५), ओडिशा (४), आसाम (३), तेलंगाणा (२) तर छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post