माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - अमेरका आणि इस्राइलने संयुक्तरित्या इराणवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर इराण आणि इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला. या युद्धाचा परिणाम आता जगभरातील बाजारपेठांवर होताना दिसत आहे. शेअर बाजारापासून ते कमोडिटी बाजारापर्यंत, रिअल इस्टेटवर या युद्धाचा परिणाम झाला. या युद्धामुळे शेअर बाजार कोसळला अन् सोनं-चांदीचे दर वाढले. अनेक तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, युद्धाचे परिणाम कालांतराने कमी होतील आणि शेअर बाजारापासून ते कच्चे तेल आणि प्रादेशिक रिअल इस्टेट बाजारांपर्यंत सर्व काही सामान्य होईल.
सततच्या बदलत्या परिस्थितीचा सोन्याच्या किमतींवर परिणाम होत आहे. साथीच्या आजारासोबतच बाजारपेठा अनिश्चिततेच्या अनेक मालिकेशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती वाढत असल्याचे पाहायला मिळेल. जेफरीजमधील इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड क्रिस वुड यांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमती दुप्पट होऊ शकतात. याचाच अर्थ की सोनं येत्या काही दिवसांत ३ लाखांपार जाण्याची शक्यता आहे.
क्रिस वुड यांनी सोन्याच्या किमतींबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, पुढील ५ वर्षांत सोन्याचे भाव प्रति औंस १०,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. याचा अर्थ सध्याच्या पातळीपेक्षा किमती दुप्पट होऊ शकतात. त्यांनी ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही मोठी भविष्यवाणी केली. सध्या भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम म्हणजे १ तोळा १.६५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. क्रुस वुड यांनी केलेल्या दाव्यानुसार या सोन्याच्या किमती भविष्यात ३ लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतात. १२ टक्के वार्षिक परतावा असलेल्या म्युच्युअल फंडला ही रक्कम दुप्पट होण्यासाठी सहा वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो हे लक्षात घेऊन आपण ही गती समजू शकतो.
क्रिस वुड यांच्या मते, भू-राजकीय जोखीम आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत खरेदी होत असल्याने सोने मजबूत तेजीच्या बाजारात आहे. त्यांचे हे विधान पश्चिम आशियातील तणाव वाढलेल्या काळात हे आले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे या प्रदेशात अस्थिरता वाढली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. ज्यामुळे सुरक्षित ठिकाणांची मागणी वाढली आहे आणि सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
एलारा कॅपिटलच्या अहवालात असे म्हटले आहे की, जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला तर सोन्याचे दर लवकरच प्रति औंस $6,000 पर्यंत पोहोचू शकतात. म्हणजेच किमती सध्याच्या पातळीपेक्षा १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात. विश्लेषकांचे असे मत आहे की, सध्याची जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि गुंतवणूकदारांचे सुरक्षित मालमत्तेकडे स्थलांतर यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याती शक्यता आहे. दरम्यान, 'जर त्यांचे ध्येय साध्य झाले नाही तर युद्ध अनेक आठवडे चालू राहू शकते.', असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. अशाातच, इराणने हल्ले तीव्र करण्याची धमकी दिली, ज्यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात कारण अधिक गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

Post a Comment