अहिल्यानगर जिल्हा बँकेची मतदारयादी तयार करण्यापूर्वी बोगस संस्था रद्द करा; माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची मागणी

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यापूर्वी बोगस संस्थांची नोंदणी रद्द करा, अशी मागणी माजी खासदार तथा विखे साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. सहकार खात्याने आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही, त्यामुळे केवळ निवडणुकीपुरताच या ‘कपाटा’तील संस्थांचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली आहे. बँकेची निवडणूक घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाने मतदार यादी तयार करण्याची सूचना जिल्हा बँकेला केली आहे. मात्र ही यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच माजी खासदार विखे यांनी जिल्ह्यात अनेक बोगस संस्था कागदोपत्री सुरू आहेत, प्रत्यक्षात त्या कामकाज करत नाहीत, काही तालुके यासाठी प्रसिद्ध आहेत, केवळ निवडणुकीच्या ठरावा पुरता त्यांचा वापर केला जातो. मतदार यादीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी या ‘कपाटा’तील संस्था बंद कराव्यात, असे सांगितले आहे.

सहकार विभागाने यापूर्वी या संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ज्याप्रमाणे देशातील मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी ‘एसआयआर’ कार्यक्रम निवडणूक आयोगकडून राबवला जातो, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ‘एसआयआर’ कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सुचवले.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी समीकरणे जुळणार!

कुक्कुटपालन, दुग्ध, पाणीपुरवठा, शेळीमेंढी पालन अशा अनेक संस्था प्रत्यक्षात बंद आहेत. तरीही त्यांचे ठराव मतदार यादीत येतात. काही तालुके यासाठी प्रसिद्ध आहेत, केवळ साखर कारखान्यांच्या ब वर्ग सभासद नोंदणीसाठी या संस्था नोंदवल्या जातात व पुढे त्या जिल्हा बँकेच्या मतदार यादीत समाविष्ट होतात, असेही विखे म्हणाले.

प्राजक्त तनपुरे यांच्या प्रवेशास विरोध

राहुरी विधानसभा निवडणूक पोटनिवडणुकीचे वेध सध्या लागले आहेत. देशातील पाच राज्यांसह महाराष्ट्रातील राहुरी व बारामती या दोन ठिकाणच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होतील असे भाकीत करून सुजय विखे म्हणाले की, राहुरी पोटनिवडणुकीच्या सर्वेक्षणात माझे नाव जरी प्रथम क्रमांकावर येत असले तरी मी या स्पर्धेत नाही. माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत, याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले की भाजपमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. परंतु आमची गाडी भरलेली आहे. आणखी किती जणांना बसवणार, असे सांगत त्यांनी या प्रवेशास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला. तनपुरे यांनी गुहा येथे केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना विखे यांनी ते राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रवक्ते आहेत का? त्यांच्या पक्षाचे अस्तित्व दिसत नसल्याने ते विलीनीकरणावर बोलत आहेत, अशीही टीका केली.

केरळ विधानसभेची जबाबदारी

माजी खासदार सुजय विखे यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर केरळ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे. विखे यांनीच ही माहिती दिली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी दोनवेळा केरळ दौरा केला आहे, त्यानंतर येत्या १५ मार्चला ते पुन्हा केरळ दौऱ्यावर जाणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post