युद्ध थांबणार? ट्रम्प म्हणाले – आता इराणमध्ये काहीच शिल्लक नाही

 


नवी दिल्ली : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की इराणमध्ये आता हल्ला करण्यासाठी “जवळजवळ काहीच शिल्लक राहिलेले नाही”, त्यामुळे हे युद्ध लवकरच संपू शकते. अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांच्या लष्करी कारवाईने जवळजवळ सर्व लक्ष्ये गाठली असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ते म्हणाले — “आता थोडेफार बाकी आहे… मला वाटेल तेव्हा हे युद्ध संपू शकते.”

इस्रायलची वेगळी भूमिका –

मात्र ट्रम्प यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी स्पष्ट केले की युद्ध अजून थांबणार नाही. सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत आणि निर्णायक विजय मिळेपर्यंत इस्रायल लढत राहील, असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वी — व्हाईट हाऊस

व्हाईट हाऊसने सांगितले की अमेरिकेचे लष्करी अभियान ‘Operation Epic Fury’ मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मते युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा अमेरिकेची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील आणि इराण शरणागती पत्करेल.

होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचा ताबा

इराणच्या शक्तिशाली लष्करी संघटनेने, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने होर्मुझ सामुद्रधुनीच्या समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार इराणने या समुद्री मार्गात सागरी सुरुंग (माइन्स) पेरण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वांत महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असून जगाच्या सुमारे २०% तेल आणि गॅस पुरवठा याच मार्गाने होतो. हा मार्ग आता जवळजवळ बंद पडला आहे.

जगभरात ऊर्जा संकट

या युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाची किंमत १२० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचली आहे. अनेक ऊर्जा कंपन्यांनी खाडी क्षेत्रातील आपले कामकाज बंद केले आहे. समुद्रातील हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. UAE जवळ एका कंटेनर जहाजावर हल्ला झाला. कतारने नैसर्गिक गॅसचे उत्पादन थांबवले आहे. बहरीनने सांगितले की करारानुसार तेल पुरवठा करण्यात ते असमर्थ आहेत. या सर्व घटनांमुळे जागतिक ऊर्जा बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे.

होर्मुझ बंद राहिल्यास जगावर गंभीर परिणाम

मध्य-पूर्वेतील हे युद्ध आता केवळ लष्करी संघर्ष राहिलेले नसून जागतिक तेल, गॅस आणि व्यापारावर परिणाम करणारे मोठे संकट बनत चालले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी जर दीर्घकाळ बंद राहिली तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post