माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यातील दुष्काळ, एमपीएससीतील घोटाळा आणि एसआयआर प्रक्रियेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने दुष्काळी परिस्थिती आणि पक्ष संघटनेवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं.
रोहित पवार यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा केल्याचं सांगत दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा मांडला. मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांत दौरा केल्याचं त्यांनी सांगितलं.
रोहित पवार म्हणाले, “मागच्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागात दौरा केला आहे. आमच्या बैठका होत होत्या, त्यावेळी शरद पवारांनी एल निनोमुळे पावसाचा खंड पडणार आहे. हे त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं. ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाला. जूनचा पाऊस कमी झाला. जुलैमध्ये पाऊस झाला, त्यावेळी सरकारमधील नेते, अधिकारी विसरून गेले की दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 50 ते 60 टक्केच पाऊस झाला आहे,” असे त्यांनी म्हटले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करताना केवळ प्रसिद्धीसाठी किंवा फोटो काढण्यासाठी आंदोलन करू नये, असं आवाहनही रोहित पवार यांनी केलं. नव्या पिढीचा राजकीय आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी तरुण पिढीला विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “फोटो काढण्यासाठी आंदोलन करू नका. लोकं हुशार झाली आहेत. नवी पिढी आक्रमक आहे, अभ्यासू आहे. त्यामुळे ह्या पिढीला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल.”
यंदा दिवाळी साधी साजरी करा
राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत रोहित पवार यांनी नागरिकांना यंदा दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाचा उल्लेख करत त्यांनी सरकारकडे सरसकट मदतीची मागणी केली. रोहित पवार म्हणाले, “यंदा दिवाळी साधी साजरी करा. शेतकरी अडचणीत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की, सरसकट मदत करू. आपण शेवटपर्यंत हाच शब्द लावून धरायचा आहे. आपण सरकारला 12 दिवसांचा वेळ देऊ. जर झालं नाही तर समृद्धी महामार्ग आपण अडवणार आहोत,” असा थेट इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Post a Comment