.. तर, बाळासाहेबांनी त्यांना पाच फुट जमिनीत गाडले असते, शिवसेनेचा हल्लाबोल

 


मुंबई| 'देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, आज शिवसेनाप्रमुख हवेच होते, असे जनतेला प्रकर्षाने वाटते. संकटाचे वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते,' असा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) आठवणी जाग्या केल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेबांचे विचार मांडले आहेत. तसंच, सध्याचे राजकारण, कंगना राणावतचे स्वातंत्र्यावरील वक्तव्य, अमरावतीतील हिंसाचार यावर आज बाळासाहेब असते तर काय केलं असतं?, यावर भाष्य करण्यात आलं आहे. 

'महाराष्ट्राच्या चार शहरात दंगल उसळली. अमरावतीत तर अजूनही संचारबंदी आहे. सामनाच्या अग्रलेखात त्याचाही समाचार घेण्यात आलाय. तो म्हणतो- त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलन केली. त्या आंदोलनामुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.




'रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची बंदची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. 


'गुजरात दंगलीनंतर सारे जग मोदी हटाव, मोदी हटावच्या आरोळ्या ठोकीत असताना आणि त्या आरोळ्यांत भाजपचेच वरिष्ठ मंडळ सामील झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दमदारपणे म्हणाले, 'छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल. हिंदूंची उमेद मरेल', हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व. ओठात एक पोटात दुसरे हे धोरण होते. त्यात धोरणाचे ते तोरण बांधत राहिले,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

'स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते,' अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.

'शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हाती आधी हातोडा दिला. तो हातोडा अयोध्येत निर्भयपणे चालवला. म्हणून आज रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहत आहे. त्यानंतर धर्मांध शक्तीविरुद्ध हिंदूंच्या हातात तळपणाऱ्या तलवारी दिल्या. हिंदू एकटवला, जात- पंथाच्या भिंती तोडून एक झाला व दिल्लीत हिंदू विचारांचे राज्य सुरू झाले ते आजतागायत व्यापक आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post