राहुल माने यांचा उपोषणाचा इशारा ; अधिकारी कर्मचारी संशयाचा भोवऱ्यात
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील कौडगाव येथील सांडवा दुरुस्तीच्या कामाच्या निविदा तसेच इतर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी राहुल माने यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत राहुल माने यांनी कुकडी पाटबंधारे क्रमांक दोन श्रीगोंदा यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देखील दिले होते.
सांडवा दुरुस्तीच्या कामाच्या निविदा प्रक्रिया तसेच इतर ऑफलाईन व ऑनलाईन झालेल्या निविदांचीचौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माने यांनी केली आहे. सदर कामांची चौकशी करण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. यामुळे संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निविदा पात्र करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांचा स्वाक्षऱ्या असतील त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील कौडगाव येथे सांडवा दुरुस्ती व इतर कामाच्या अनुषंगाने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. येथील कामासाठी मागविण्यात आलेल्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाले असून या प्रक्रियेवर राहुल माने यांनी दिलेल्या निवेदनामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.कौडगाव येथील कामाबाबत कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यातील निविदा अपात्र करताना चुकीचे निकष लावण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याबाबत कुकडी सिंचन मंडळाचे पुणे येथील अधीक्षक अभियंता यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला असून सदर बाबीचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.
सदर कामासाठी भरलेली निविदा शुल्लक कारणास्तव अपात्र करण्यात आली आहे. कोणतीही नोटीस न पाठवता निविदा अपात्र करण्यात आली. तसेच सदर कामासाठी पात्र करण्यात आलेल्या ठेकेदाराकडे नूतन व्यावसायिक कर प्रमाणपत्र पण नाही. तरीदेखील त्यांना पात्र करण्यात आले आहे असा आरोप करण्यात आला आहे. सदर निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित खात्या अंतर्गत मागील तीन वर्षात झालेल्या ऑनलाईन, ऑफलाइन सर्वच निविदांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा राहुल माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
सर्वच कामांची चौकशी करा !
ऑनलाइन निविदामध्ये एका कंत्राटदाराने दोन ठिकाणी सह्या केल्या होत्या. तरी देखील त्यास पात्र ठरविण्यात आले आहे. मात्र याच कारणावरून निविदा अपात्र देखील करण्यात आली आहे. एकाच खात्यामध्ये वेगवेगळा न्याय कसा. सदर निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई होण्याची गरज आहे. तसेच संबंधित खात्या अंतर्गत झालेल्या सर्वच ऑनलाइन, ऑफलाइन निविदांची चौकशी करण्यात यावी. असेही राहुल माने यांनी म्हटले आहे.

Post a Comment