साईभक्तांना दर्शन देण्यासाठी संस्थानचे नियोजन ठरले कुचकामी

 


शिर्डी | एक सनदी अधिकारी त्यांंच्या दिमतीला उपजिल्हाधिकारी दर्जाचे चार अधिकारी प्रशासकीय व विभाग प्रमुख यांच्यासह हजारो कर्मचारी असलेल्या साईसंस्थान प्रशासनाने यापूर्वी एका एका दिवसात नियोजनबद्ध काम करून लाखो साईभक्तांचे सुरळीतपणे दर्शन घडवून आणण्याचा इतिहास आहे. हा इतिहास मात्र आता सोमवारच्या साईदर्शनासाठी केलेल्या आंदोलनानंतर संस्थान प्रशासनाकडून मोडीत निघाला आहे. अवघ्या पंधरा हजार भाविकांना दैनंदिन दर्शन देताना जर ऑनलाईनच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर तांत्रिक अडचणीमुळे शेकडो किमी दूरवरून आलेल्या साईभक्त साईसमाधी दर्शनासाठी मुकणार असेल तर संस्थानचे नियोजन कुचकामी ठरले असल्याचा आरोप साईभक्तांकडून केले जात आहे.


शेकडो किमी दूरवरुन शिर्डीत साई दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भक्ताला साईदर्शन मिळावे ही त्याची मनस्वी इच्छा असते, तसे जर बघितले तर साई समाधीचे दर्शन म्हणजे फक्त इच्छा नव्हे तर त्या भक्तांचा अध्यात्मिक स्वातंत्र्याचा अधिकारच मानला गेला पाहिजे.परंतु नियोजनशून्य कारभार व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेकडो मैल दूर प्रवास करूनही शिर्डीत आल्यानंतर साईभक्तांना साईदर्शनासाठी प्रशासनाच्या कार्य विरोधात ठिय्या आंदोलन करून दर्शनासाठी विनवणी करावी लागते ही तर मोठी खेदजनक बाब आहेत. एकीकडे शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुललेली असताना दर्शन रांगा मात्र रिकाम्याच असतात.


ऑनलाईन पास संकल्पना करोना महामारी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य असली तरी मात्र ऑनलाईन पास भक्तांसाठी सुविधा नसून अडचण निर्माण झाल्याचे चित्र शिर्डीत पाहायला मिळाले. ऑफलाईन दर्शन व्यवस्था व प्रसादालय सुरू करून भक्तांना साई दर्शनाचा व महाप्रसादाचा आस्वाद देणे गरजेचे आहे. दररोज भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता ऑनलाइन पासेसच्या संख्येची मर्यादा सुद्धा वाढवणे गरजेचे आहे. परंतु तसे झाले नाही परिणामी ऑनलाइन पासेसच्या प्रिंट घेण्यासाठी भक्तांना दर्शनापूर्वी शिर्डीत मोठी भटकंती करावी लागत असून प्रिंट काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहे.


साईबाबा मंदिर प्रशासनाने वेळोवेळी साईभक्तांभिमुख कार्य करतांना भक्तांना सुख सुविधा पुरवून त्याचे समाधान करणे क्रमप्राप्त आहे. भाविकांचे प्रश्न, समस्या व सूचना समजून घेऊन त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. परंतु भक्तांच्या दानावर चालणार्‍या साईसंस्थान याचा विसर पडला आहे का ?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.सोमवारी साईदर्शन मिळावे या मागणीसाठी साईभक्तांनी मंदिर प्रवेशद्वार क्रमांक चार समोर केलेले आंदोलन म्हणजे प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post