दोघांवर दाखल असलेल्या सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील संदीप ताराचंद लगड (वय ३२) या तरुणाचा झालेला मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचे स.पो.नि. गणेश वारुळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपी ऋषिकेश बाळासाहेब घिगे (रा. तांदळी वडगाव) व राजेंद्र रमेश घोंगडे (रा. वडगाव तांदळी) या दोघांवर दाखल असलेल्या सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी रात्री खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
मयत संदीप लगड, आरोपी ऋषिकेश घिगे व राजेंद्र घोंगडे हे एकमेकांचे मित्र असून ते १९ जानेवारी रोजी रात्री जेवण करायला वाळकी शिवारात असलेल्या हॉटेल जंगली येथे गेले होते. मयत संदीप हा हॉटेल जंगली येथे जेवण करुन, देऊळगाव सिदधी ते तांदळी वडगाव रोडने, घराकडे येत असताना, पियुष साखर कारखान्यासमोर, डांबरी रोडवर त्याचे पाठीमागुन ऋषिकेश बाळासाहेब घिगे, हा पिंकअप गाडीमध्ये बसुन, राजेंद्र रमेश घोंगडे पिकअप गाडी चालवीत तांदळी गावचे दिशेने भरधाव वेगात येत असताना, यातील मयत संदीप यास सदर पिकअप वाहनाची पाठीमागुन जोराची धडक लागुन अपघात झाला.
सदर अपघातात त्याचे डोक्यात मार लागुन, त्याचे डोक्यातुन, नाकातोंडातुन, रक्तस्त्राव होवुन तो गंभीर जखमी झालेला असताना, त्यास, औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले नाहीतर त्याचा मत्यु होवु शकतो हे आरोपी यांना माहीती असताना देखील, त्यांनी जाणीवपुर्वक यातील मयत यास दवाखान्यात न नेता आरोपी हे घटना ठिकाणाहुन त्यांचे पिकअप गाडीमधुन अन्य ठिकाणी निघुन गेले. त्यानंतर काहीवेळाने घटना ठिकाणी येवुन फोन करुन, इतरांना बोलावुन घेतले व त्यानंतर मयत यास औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता तो औषधोपचारपुर्वी मयत झाला आहे.
तसेच आरोपी यांनी त्यांचेकडुन झालेली घटना लपविण्यासाठी त्यांचेकडील पिकअप वाहनासह इतर ठिकाणी निघुन गेले व त्यांचेकडुन सदरचा अपघात झाला नसल्याचा बनाव करुन, पुरावा नाहीसा केला होता. या प्रकरणी मयताचा भाऊ रामदास ताराचंद लगड (वय ३६, रा. तांदळी वडगाव, ता.नगर) याने २३ जानेवारीला रात्री दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०५, २३८, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केलेली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान हा अपघात नसून या दोघांनी केलेला खुन असल्याची तक्रार मयताचा भाऊ याने पोलिस अधिक्षकांकडे करून सखोल चौकशीची मागणी केली होती. अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत तसेच नव्याने पदभार घेतलेले स.पो.नि. वारुळे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण यामध्ये या दोघा आरोपींनी मयत संदीप लगड याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला पिकअपची धडक दिली व अपघाताचा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले. जेवण करताना त्यांच्या झालेल्या वादाच्या रागातून दोघांनी हा खुन केला असल्याने या गुन्ह्यात दोघांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०३ (१) असे खुनाचे वाढीव कलम २६ फेब्रुवारी रोजी रात्री लावण्यात आले आहे.
Post a Comment