जिल्हा वार्षिक नियोजनासाठी ७०० कोटींचा आराखडा मंजूर

 


अहमदनगर | राज्य सरकारकडून २०२१-२२ साठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये १०० टक्के निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत सर्वसाधारण ५१० कोटी, अनुसूचित जाती उपयायोजना १४४ कोटी व आदिवासी उपाययोजना ४६ कोटी असा एकूण ७०० कोटी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी संबंधित यंत्रणांनी विविध कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामांवर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.


मुश्रीफ म्हणाले, सर्वसाधारण योजनेकरिता जिल्ह्याचा ४७५ कोटी नियतव्यय होता. मात्र, यावर्षी वित्त मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी जादाचे ६५ कोटी वितरीत करून सर्वसाधारण योजनेकरिता ५१० कोटी निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला शंभर टक्के निधी प्राप्त झालेला आहे. यातील करोनाविषयक उपाययोजनेसाठी ३० टक्के निधी खर्च करावयाचा आहे.

उर्वरीत निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी व वेळेत निधी खर्च करावा. प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी शिर्डी संस्थाकडून १० कोटी निधी प्राप्त झाला आहे. मात्र खर्चाचे अंदाजपत्रक जास्त असल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांच्या बांधकामांसाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेने चांगला आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी १०२ कोटीची भरीव तरतूद केली आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण खर्चात करोनाविषयक उपाययोजनांसाठी १०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी सदर निधी खर्च करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. अशा सूचना ही पालकमंत्री मुश्रीफ यांनी केल्या.

मुश्रीफ यांनी सांगितले, प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णलयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नगर जिल्ह्यात ३८ हजार ९२० शेतकरी बाधीत झाले. त्यांना दिवाळीपूर्वी २८ कोटी १९ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर मदतीची रक्कम वर्ग करण्यात येईल. बैठकीपूर्वी, नगर जिल्हा रुग्णालयाच्या घटनेत मृत्यू झालेल्या ११ रुग्णांना तसेच काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीला विधान परिषद आमदार किशोर दराडे, आमदार आशुतोष काळे, लहु कानडे, मोनिकाताई राजळे, रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, किरण लहामटे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

माका, तिळवणी आणि कोऱ्हाळेत प्राथमिक केंद्र वाढणार

माका (नेवासे), तिळवणी (ता. कोपरगाव) आणि कोन्हाळे (ता. राहाता) या तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव करण्यात आला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालकांकडे या केंद्राच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.

ब्राह्मणगाव, मनोहरपूर आणि इसळक तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा

जिल्ह्यात नव्याने तीन तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा नियोजन समितीने दिला आहे. श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान, ब्राह्मणगाव (ता. कोपरगाव), श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर देवस्थान, मनोहरपूर (ता. अकोले) आणि श्री सद्गुरू हरिहर सत्संग लिंगतीर्थ ट्रस्ट, इसळक (ता. नगर) यांचा समावेश आहे. या ठिकाणी क वर्ग देवस्थानच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post