माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : कोविड-१९ महामारीच्या काळात संगनमताने कटकारस्थान रचून रुग्णांची फसवणूक केल्याचा, तसेच निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप करत शहरातील अनेक नामांकित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (गुन्हा क्र. १०१५/२०२५) डॉ. गोपाल बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. असदीप झावरे, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील हॉस्पिटल, विळद घाट येथील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा गुन्हा मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणातील सर्व आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या डॉक्टरांच्या टोळीने कोविड काळात संगनमताने जनतेच्या जीवाशी खेळ करत अवयव तस्करीसारखा अमानुष प्रकार रचला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आंदोलनाची धमकी दिली आहे. या भूमिकेवरही जाधव यांनी आक्षेप घेत, आयएमएशी संलग्न सर्व हॉस्पिटलवर ‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट’ अंतर्गत तपासणी करून, रुग्णांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे.
जाधव यांनी पुढे नमूद केले की, आरोपी डॉक्टरांच्या हॉस्पिटलचे परवाने त्वरित निलंबित करून रद्द करण्यात यावेत आणि सर्व संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी. या निवेदनाच्या प्रती महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.
Post a Comment