टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! संजू सॅमसनच्या वादळी खेळीने विडींजला लोळवलं; सेमीफायनलमध्ये आता इंग्लंडशी भिडणार



माय नगर वेब टीम 

स्पोर्ट डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये नवा इतिहास रचला आहे. सुपर-८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या, ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’ सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत सहाव्यांदा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारताने संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला. विशेष म्हणजे, ईडन गार्डन्सच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये साध्य केलेले हे आजवरचे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे.


संजू सॅमसनची रेकॉर्डब्रेक खेळी; १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

वेस्ट इंडिजने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आपले सर्वात मोठे लक्ष्य साध्य केले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७३ धावांचे लक्ष्य भारताने पार केले होते, तो विक्रम आज मोडीत निघाला. संजू सॅमसनने ५० चेंडूंत १२ चौकार आणि ४ चौकार ठोकता नाबाद ९७ धावांची खेळी साकारून विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.


तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शाई होप आणि रोस्टन चेस यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. कर्णधार होपने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या, तर चेसने ४० धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायरने अवघ्या १२ चेंडूत २७ धावा कुटून डावाला गती दिली.


मात्र, डावाच्या शेवटी रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पॉवेलने १९ चेंडूत ३४ धावा केल्या, तर जेसन होल्डरने २२ चेंडूत ३७ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनी ३५ चेंडूत ७६ धावांची अभेद्य भागीदारी करून विंडीजला १९५ धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहने सर्वाधिक २ बळी घेत विंडीजच्या धावगतीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.


ईडन गार्डन्सवर घेतला २०१६ चा घेतला बदला

आजच्या विजयाने भारतीय चाहत्यांना २०१६ च्या त्या पराभवाचा बदला घेता आला आहे. २०१६ मध्ये याच मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने १९२ धावा केल्या होत्या, मात्र वेस्ट इंडिजने ते लक्ष्य १९.४ षटकांत गाठून भारताचे स्वप्न भंग केले होते. लेंडल सिमन्स (८२*), आंद्रे रसेल (४३) आणि जॉन्सन चार्ल्स (५२) यांच्या फटकेबाजीमुळे तेव्हा भारताला बाहेर पडावे लागले होते. योगायोगाने, त्याच मैदानावर आज भारताने विजय मिळवून सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे.


आता मुंबईत रंगणार भारत विरुद्ध इंग्लं महासंग्राम:

उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर आता भारतीय संघाची गाठ बलाढ्य इंग्लंडशी पडणार आहे. हा हायव्होल्टेज सामना ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. घरच्या मैदानावरील हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी टीम इंडिया आता सज्ज झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post