सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन



मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान; आत्मनिर्धार फाउंडेशनतर्फे स्पर्धेची घोषणा 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८-९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह एकूणच साहित्यप्रेमींच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबरपर्यंत सदर स्पर्धेतील प्रवेशिका स्वहस्ते, पोस्ट, कुरियर किंवा ईमेल याद्वारे पाठविण्याचे आवाहन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले आहे. 


याबद्दल अधिक माहिती देताना मेटे महाराज यांनी सांगितले की, साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक व साहित्यरसिक यांना जोडणारा दुवा असतो. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्जनशील मंडळींना यानिमित्ताने अशा कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सदर स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवलेले आहे. निबंध, चित्रकला, कविता आणि वेशभूषा आदि स्पर्धांचे आयोजन यानिमित्ताने करण्याचे ठरले आहे. यासाठी aatmnirdharfoundation2014@gmail.com या ईमेलवर किंवा ‘न्यू तिरंगा प्रिंटर्स, गाळा नंबर १, छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल, नालेगाव, तानवडे पेथलॉजीकल लॅबजवळ, अहिल्यानगर. पिन ४१४००१’ या पत्त्यावर आपल्या प्रवेशिका वेळेमध्ये पोहोच कराव्यात. अधिक माहितीसाठी ९८२३९३४२४६ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा. 


याबद्दल माहिती देताना आत्मनिर्धार फाउंडेशनचे (निंबळक) अध्यक्ष महादेव गवळी यांनी सांगितले की, पारनेरचे साहित्यिक भूमीपुत्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमधील एक महत्वाचे नाव म्हणून सेनापती बापट यांची ओळख आहे. त्यांच्यासह एकूणच नगर जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीला उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही साहित्य संमेलनात केला आहे. वाचकांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने आम्ही सदर स्पर्धांची घोषणा केली आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या शाळांचाही यानिमित्ताने आम्ही सत्कार करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक शाळा, शैक्षणिक संस्था आणि साहित्य रसिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा. 


चित्रकला-निबंध स्पर्धेचे विषय व नियम 

२०० ते २५० शब्दांमधील निबंधलेखन या स्पर्धेत ‘सेनापती बापट यांचे विचार व कार्य’, ‘नगर जिल्ह्याचे साहित्य-संस्कृतीमधील योगदान’ आणि ‘नगर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक (कोणत्याही एका स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर आधारित)’ असे तीन विषय आहेत. तर, चित्रकला स्पर्धेत ‘सेनापती बापट किंवा इतर स्वातंत्र्यसैनिक (कोणत्याही एका स्वातंत्र्यसैनिक यांची भावमुद्रा)’ असे दोन विषय आहेत. यामध्ये गट १ : वय वर्षे ५ ते १०, गट २ : वय वर्षे ११ ते १५, गट ३ : वय वर्षे १६ ते २० आणि गट ४ : खुला असे चार गट असतील. यामध्ये प्रत्येकी तालुकानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन अधिक प्रत्येक गटनिहाय जिल्हास्तरीय तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या सर्वांचा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती मेटे महाराज यांनी दिली. 


कविता लेखन व वेशभूषा स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरस्कार 

‘सेनापती बापट यांचे विचार व कार्य’ या विषयावर विशेष नवीन कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. तर, संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान आयोजित ग्रंथफेरी व ग्रंथदिंडी कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धा होणार आहे. यामध्ये ‘भारतातील महत्वाचे लेखक, महापुरुष आणि पारंपरिक वेशभूषा’ असा विषय आहे. या दोन्ही स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय असे प्रत्येकी तीन पुरस्कार्थी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिक माहिती ‘अहिल्यानगर साहित्य संमेलन’ (www.facebook.com/ahilyanagar.sahitya) या फेसबुक पेजवर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती महादेव गवळी यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post