माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – अहिल्यानगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचोंडी पाटील गावचे सरपंच व महाविकास आघाडीचे युवा नेते शरद खंडेराव पवार यांना छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया व नाशिक विभागीय उपायुक्त अजय मोरे यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशावर हायकोर्टाने स्थगिती दिली असून सरपंच पवार यांना पुन्हा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.
या निर्णयानंतर पवार गावात परतताच ग्रामस्थ, महिला भगिनी व पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य मिरवणूक काढत उत्स्फूर्त स्वागत केले.
पार्श्वभूमी
मागील महिन्यात माहिती अधिकार कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक सुधीर राजाराम भद्रे यांनी सरपंच पवार यांच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांना सरपंच पदावरून अपात्र ठरविले होते. नंतर पवार यांनी हा आदेश नाशिक विभागीय उपायुक्तांकडे आव्हान दिला, मात्र तेथेही निर्णय त्यांच्या विरोधात गेला.
शेवटी त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पिटीशन दाखल केली. न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या समोर झालेल्या पाचव्या सुनावणीत हायकोर्टाने जिल्हाधिकारी व उपायुक्त यांच्या आदेशाला स्थगिती देत सरपंच पद पुन्हा बहाल करण्याचा आदेश दिला.
कोर्टातील युक्तिवाद
सरपंच पवार यांच्यावतीने वरिष्ठ वकील अँड. आर. एन. धोरडे आणि अँड. विठ्ठल दिघे यांनी बाजू मांडली, तर विरोधी गटाकडून वरिष्ठ वकील अँड. अश्विन होण यांनी काम पाहिले. अर्जदारांकडून अतिक्रमणाबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर न केल्यामुळे न्यायालयाने पवार यांच्या बाजूने निकाल दिला.
सरपंच पवार यांची प्रतिक्रिया
या निर्णयानंतर सरपंच शरद पवार म्हणाले,
> “सदर कारवाया राजकीय सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून केल्या होत्या. आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडले, त्याचाच परिणाम म्हणून आमच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. पण सत्याला कोणी हरवू शकत नाही, शेवटी सत्याचाच विजय होतो.”
स्थानिकांची प्रतिक्रिया व समर्थन
खासदार निलेश लंके, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संपतभाऊ मस्के, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला भगिनी यांनी पवार यांच्या विजयाचे स्वागत केले.
हायकोर्टाच्या निकालानंतर पवार यांनी अँड. धोरडे, अँड. दिघे, अँड. सत्यजित पवार, अँड. रविकिरण पाटील व सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
Post a Comment