नगर विधान परिषद निवडणुकीचे पडघम : सदस्य, नगरसेवकांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश



अहमदनगर | 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ जागांची मुदत संपणार आहे. याठिकाणी तत्पूर्वी निवडणूक होणार असल्याने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपालिकेतील नगरसेवकांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले आहेत. यामुळे विधान परिषद निवडणूक होणार्‍या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, सभापती आणि नगरसेवकांच्या नजरा इच्छुक उमेदवारांकडे लागल्या आहेत.

राज्यातील मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर आणि नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदे जागेची मुदत 1 जानेवारी 2022 संपणार आहे. त्यापूर्वीच या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे. नगरमधून विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे आ.अरुण जगताप यांना दोन वेळा संधी मिळालेली असून डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार की महाविकास आघाडीकरून नवा चेहरा पुढे केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नगरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नव्या सत्तासमिकरणात काही बदल होणार का, याचीही चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळी ही जागा मित्र पक्षाकडे जाणार की राष्ट्रवादी आपला हक्क कायम ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. ही निवडणूक आणि संभाव्य उमेदवारी याबाबत राजकीय आणि पक्षीय पातळीवर आतापर्यंत सर्वांनीच तोंडावर बोट ठेरले आहे. दुसरीकडे आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासून काही नेत्यांनी पडद्याआड हालचाली सुरू केल्या आहे. या निवडणुकीत ‘मनी अ‍ॅण्ड मसल पावर’ चा प्रभाव अधिक जाणवत असतो. त्यामुळे या खेळात कोण उतरतो आणि लढतो, याकडे मतदार असणार्‍या सदस्यांचे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील पाच नगर परिषदांची मुदत संपत आली असून या ठिकाणी असणारे नगरसेवकांच्या मतदान पात्रतेचा मुद्दाही अद्याप स्पष्ट नाही.

एखाद्या निवडणुकीसाठी 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे मतदानासाठी पात्र असल्यास त्या निवडणुका होतात. यामुळे जिल्ह्यातील पाच नगर परिषदेतील नगरसेवकांची मुदत संपलेली असल्याने निवडणुकीसाठी अपात्र ठरली तरी त्याचा विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही, हे निवडणूक कायदे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश नगर पालिका राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यातील आहेत.


विधान परिषदेसाठी जिल्ह्यात 500 हून अधिक मतदार आहेत. मुदत संपलेल्या पाच नगरपरिषदेतील सदस्य वगळले तरी 396 च्या जवळपास सदस्य मतदार आहेत. यात नगर महापालिकेचे 72, जिल्हा परिषदेचे 69 सदस्य आणि 14 पंचायत समिती सभापती हे सर्वाधिक मतदार आहेत. श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे मतदार आहेत.


राष्ट्रवादीकडून काही नावांवर चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे. भाजपमधील एक माजी आमदार हे राष्ट्रवादीत प्रवेश करून विधान परिषद लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, ही चर्चाही अद्याप जर-तर च्या फेर्‍यात अडकलेली आहे. भाजपकडून या निवडणुकीत राजकीय डाव टाकण्याची जबाबदारी खा.डॉ.सुजय विखे सांभाळणार की माजी मंत्री राम शिंदे याबाबतही स्पष्टता नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post