पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम


 माय वेब टीम 

नवी दिल्ली - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC Bank वर असलेले निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकेने आणखी सहा महिन्यांनी वाढवले आहेत. PMC बँकेवरील निर्बंध 31 डिसेंबर 2021पर्यंत कायम राहणार आहेत, अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे RBI ने शुक्रवारी (25 जून) जाहीर केली. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पीएमसी बँकेने दिलेल्या एकूण 8383 कोटी रुपयांच्या कर्जांपैकी 70 टक्के कर्ज HDIL या एकाच कंपनीला देण्यात आल्याचं उघड झालं होतं. तसंच, बँकेच्या व्यवहारात आणखी काही घोटाळे असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर सप्टेंबर 2019मध्ये या बँकेवर पहिल्यांदा निर्बंध लागू करण्यात आले होते. सुरुवातीला बँकेच्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. बँकेचे निर्बंध आतापर्यंत अनेकदा वाढवण्यात आले असून, त्याच्या नियमांत बदलही करण्यात आले आहेत.

PMC बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला (Centrum Financial Services) या बँकेचं अधिग्रहण करून तिचं स्मॉल फायनान्स बँकेत (Small Finance Bank) रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली होती. पीएमसी बँकेच्या अधिग्रहणासाठी इच्छूक असलेल्यांकडून अर्ज मागवण्याबद्दलची अधिसूचना (Expression of Interest) रिझर्व्ह बँकेने तीन नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली होती. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसने एक फेब्रुवारी 2021 रोजी आपला प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला. हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यातच तत्त्वतः मंजूर केला होता. या प्रस्तावानुसार आता सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसकडून पीएमसी बँकेचं अधिग्रहण (Take Over) केलं जाणार आहे. अधिग्रहण आणि स्मॉल फायनान्स बँकेत तिचं रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. म्हणूनच अधिग्रहणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी, या हेतूने पीएमसी बँकेवरचे निर्बंध 31 डिसेंबर 2021पर्यंत वाढवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post