फडणवीस म्हणतात, बदल्यांशिवाय या सरकारला दुसरे काहीच सुचत नाही

 


माय अहमदनगर वेब टीम

नागपूर - कोरोना सारख्या गंभीर संकटातही राज्यातील आघाडी सरकारने कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे ५०० कोटींचा अतिरिक्त खर्च महाराष्ट्राला सोसावा लागला. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही आणि हे सरकार बदल्या करत आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. ०२ ) नागपुरात केला आहे. 


कोरोनासारखी गंभीर परिस्थिती उद्धवलेली असताना राज्यातील आघाडी सरकार केवळ बदल्यांमध्ये गुंतलेले आहे. बदल्यांशिवाय या सरकारला दुसरे काहीच सुचत नाही अशी सडकून टीका फडणवीस यांनी केली. आमच्या सरकारमध्ये आम्ही बदल्या केल्या तेव्हा कोरोना सारखं गंभीर संकट नव्हतं, असा टोलाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला. 


पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहाणी करण्यासाठी फडणवीस बुधवारी नागपुरात आले  होते. विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बदल्यांवर सडकून टीका केली. अख्ख शासन केवळ आणि केवळ बदल्यांच्या मागे लागले आहे. बदल्या करणे हा एकमेव धंदा शासनामध्ये चाललेला आहे. बदल्याही आवश्यक असतात. पण, एखाद्यावर्षी त्या नाही केल्या तरी काही फरक पडत नाही. एका वर्षीच्या बदल्यांचा खर्च ५०० कोटी येतो. एकीकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सरकारजवळ पैसे नाही. मग बदल्या कशाच्या करता, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

सरकार १५ टक्के बदल्या करीत आहेत. कोरोना काळात खूप अत्यावश्यक वगळता इतर बदल्या सहज टाळता आल्या असत्या. फडणवीस सरकारच्या काळातही बदल्या होतच होत्या, असा आरोप मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी केला. पण, आमच्या काळात कोरोना नव्हता. आमच्या काळात कोरोना असतांना बदल्या केल्या तर त्यांना आरोप करता आला असता, असा टोला फडणवीस यांनी हाणला.


खासगी रूग्णालयात लुट, नियंत्रण नाही

खासगी रूग्णालयात रूग्णांची लूट होत आहे. या संदर्भात सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सरकार कुठेतरी दबावाखाली काम करीत आहे. पहिल्यांदा जी. आर. काढताना उशिर केला. नंतर काढला तर त्यात अनेक त्रूटी होत्या. यांची सरकार चालवण्याची मानसिकताच नाही. राज्यातील परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. पुणे येथे एका वाहिनीच्या प्रतिनिधीचा तरूण वयात झालेला मृत्यू दुदैवी आहे. सरकारनेही याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असे ते फडणवीस म्हणाले.

पुरग्रस्तांचे जीआर विदर्भाला लागू करा

यापूर्वी राज्यात सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या वेळी आमच्या सरकारने  सहा शासन निर्णय काढून त्या भागांसाठी विशेष योजना लागू करीत सवलती दिल्या होत्या. हे जीआर विदर्भालाही लागू करावेत यासाठी आमचे प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थितीची माहिती देऊन विदर्भासाठी जास्तीत जास्त मदत मिळवू, असे फडणवीस म्हणाले. पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती मानव निर्मित आणि समन्वय नसल्याचा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post