मुंबई - पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगरमधील राहुरी या मतदारसंघाच्या पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक -
अधिसूचना कधी निघणार ? - ३० मार्च २०२६
अर्ज दाखल कऱण्याची अंतिम तारीख - ६ एप्रिल २०२६
अर्जाची छाननी कधी होणार? ७ एप्रिल २०२६
अर्ज माघारी घेण्याची तारीख - ९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख - २३ एप्रिल २०२६
मतमोजणीची तारीख - ४ मे २०२६
पुण्यातील बारामतीचे आमदार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात २८ जानेवारी रोजी अकाली निधन झालं होतं. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. राहुरी आणि बारामती या दोन्ही विधानसभेच्या रिक्त जागांवर आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकणाच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारामती अन् राहुरीत उमेदवार कोण असतील ?
दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक होत आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. तर राहुरीत शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणाच्या निवडणुका बिनविरोधात होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बिनविरोध होणार पोट निवडणुका ?
बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या विधानसभेच्या पोट निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना बिनविरोध निवडणुका व्हाव्यात, असे आवाहन विरोधकांना करण्यात आले. ते म्हणाले की, राहुरी आणि बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. पण आमच्यावर निवडणूक लादली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले होते. महाराष्ट्रातील मागील काही पोट निवडणुकीचा इतिहास पाहिला तर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोधतच होतील, असा अंदाज आहे.

Post a Comment