रैनाच्या माघार नाट्यानंतर अखेर CSKने केलं ट्विट

 


माय अहमदनगर वेब टीम

क्रिकेट चाहत्यांना IPLचे वेध लागले असताना एक विचित्र गोष्ट घडली. चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परतला. सुरूवातीला त्याच्या या माघारीमागे वैयक्तिक कारण आहे असं सांगितलं जात होतं. पठाणकोटमध्ये त्याच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला आणि करोनाची भीती अशा दोन कारणांचा त्याच्या माघारीशी संबंध जोडला गेला होता. त्यानंतर सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यात हॉटेल रूमवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे वृत्त आऊटलूकने दिले. या साऱ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर रैनाने आज एक ट्विट केले. त्यावर CSKसंघाकडूनही एक ट्विट करण्यात आले.

काय आहे रैनाचं ट्विट-

रैनाने ट्विटवरुन मंगळवारी पंजाब पोलिसांना आवाहन केलं. “पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत घडलेली घटना भयंकर आहे. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात माझ्या काकांचा जागीच मृत्यू झाला तर माझ्या आत्याला आणि चुलत भावाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान काल रात्री माझ्या भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. माझ्या आत्याची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं रैनाने ट्विट केलं.



“त्या रात्री नक्की काय झालं हे अजून आम्हाला समजलेलं नाही. मी पंजाब पोलिसांना आवाहन करतो की त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा. यांच्याबरोबर हे कृत्य कोणी केलं हे जाणून घेण्याचा हक्क आम्हाला आहे. त्या गुन्हेगारांना अशाप्रकारे भविष्यातही गुन्हे करण्यासाठी मोकाट सोडता येणार नाही, असंही रैनाने ट्विटमध्ये नमूद केलं.

यावर CSKसंघाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्विट करण्यात आलं. रैना प्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्यानंतर प्रथमच CSKने रैनासंबंधी ट्विट केले. “रैना (चिन्ना थला), तू खचून जाऊ नकोस. खंबीर राहा. संपूर्ण चेन्नई संघाचे चाहते तुझ्यासोबत आहेत”, असे ट्विट करण्यात आले.



दरम्यान, रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही १५ ऑगस्टला निवृत्ती स्वीकारली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post