शेतकरी, मजूर संकटात; देशात गतवर्षी ४२ हजारांवर आत्महत्या

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - गतवर्षी म्हणजे 2019 मध्ये 42 हजार 480 शेतकरी आणि मजुरांनी आत्महत्या केली असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिली आहे. वर्ष 2018 च्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सहा टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या कमी झाली, मात्र मजुरांच्या आत्महत्येची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे.


वर्ष 2019 मध्ये अपघाती मृत्यू व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 10 हजार 281 इतकी होती. तत्पूर्वीच्या वर्षात हा आकडा 10 हजार 357 इतका होता. दुसरीकडे मजुरांच्या अपघाती मृत्यू व आत्महत्येचा आकडा 30 हजार 132 च्या तुलनेत वाढून 32 हजार 559 वर गेला. देशातील एकूण आत्महत्येच्या प्रमाणाचा विचार केला तर कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांच्या आत्महत्येची टक्केवारी 7.4 टक्के इतकी होती. 


सरत्या वर्षामध्ये देशात 1 लाख 39 हजार 123 लोकांनी आत्महत्या केल्या. तत्पूर्वीच्या वर्षात हा आकडा 1 लाख 34 हजार 516 इतका होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विविध कारणांचा ऊहापोहही एनसीआरबीने आपल्या अहवालात केला आहे. वर्ष 2019 मध्ये 5563 पुरुष शेतकऱ्यांनी तर 394 महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याशिवाय कृषी क्षेत्रात मजुरी करणाऱ्या 3749 पुरुषांनी व 575 महिलांनी आत्महत्या केली. प. बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मणिपूर, चंदीगड, दमण आणि दीव, दिल्ली, लक्षद्वीप, पुदूचेरी याठिकाणी एकही शेतकरी आत्महत्येची नोंद झाली नाही. 


रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांच्या आत्महत्येचा विचार केला तर यातील 29 हजार 92 जण पुरुष होते तर 3467 महिला होत्या. बिहारमध्ये मजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ झाली, त्यापाठोपाठ पंजाब, झारखंड आदी राज्यात वाढ झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात आत्महत्येचे प्रमाण जास्त होते. केरळमधील कोल्लम तसेच प. बंगालमधील आसनसोल येथे आत्महत्येची टक्केवारी सर्वात जास्त होती. मोठ्या शहरांमध्ये चेन्नईमध्ये सर्वाधिक 2461 आत्महत्यांची नोंद झाली. त्याखालोखाल दिल्लीत 2423, बंगळूरमध्ये 2081 आणि मुंबईमध्ये 1229 आत्महत्यांची नोंद झाली. 53 मोठ्या शहरांतील एकूण आत्महत्यापैकी 36.6 आत्महत्या या चार शहरात झाल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post