अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर :
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत बटेवाडी (ता. जामखेड) येथून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणी संदिप बंडु मरकड (वय 21, रा. बटेवाडी, ता. जामखेड) यास पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थागुशाचे पथक अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत होते. गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 04/09/2025 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी येथे छापा टाकून संशयितास ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने स्वतःचे नाव संदिप बंडु मरकड असल्याचे सांगितले. पंचांच्या उपस्थितीत झडती घेतली असता त्याच्या कब्जातून देशी बनावटीचा एक गावठी कट्टा (किंमत ₹35,000) आणि एक जिवंत काडतुस (किंमत ₹1,000) असा एकूण ₹36,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पोनि/किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रसाठ्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
Post a Comment