ढगेवाडी शाळेचा कायापालट करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान





विकास चोभे -

५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा जलसंधारणमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तर विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार काशिनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे यांचे उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढगेवाडी (चांभुर्डी) येथील शिक्षक नवनाथ शंकर वाळके यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.




२०१८ पासून नवनाथ वाळके आणि त्यांची पत्नी प्रतिभा पोळ हे दोघे या शाळेत कार्यरत आहेत. अत्यंत कमी जागेत सुरू असलेली शाळा स्थलांतर करून १० गुंठ्यांच्या नव्या जागेत नेण्याचे कठीण काम त्यांनी हाती घेतले आणि कोरोना काळातील आव्हानांना सामोरे जात मार्च २०२३ पर्यंत ते यशस्वीरीत्या पूर्ण केले.



शाळा स्थलांतरासोबतच दोन सुसज्ज वर्ग खोल्या, लोकवर्गणीतून ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वयंपाक घर, मुख्याध्यापक कार्यालय, भव्य स्टेज, ध्वजस्तंभ, संपूर्ण शाळेची लाईट फिटिंग अशा सुविधा निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या मदतीने सोलर पॅनल, पेव्हर ब्लॉक, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही, बोअरवेल, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय या सोयी उपलब्ध केल्या. तसेच ब्रिटानिया कंपनीच्या सीएसआर फंडातून ७० हजार किंमतीचे वॉटर फिल्टर व कुलर मिळवले.



शाळेची भौतिक सुविधा वाढवतानाच शिक्षणाच्या गुणवत्तेतही त्यांनी भर घातली. २०२१-२२ मध्ये केवळ २० विद्यार्थी असलेली शाळा आज ५८ पटांपर्यंत वाढली असून ४-५ किमी अंतरावरून विद्यार्थी रोज या शाळेत येऊ लागले आहेत. पालकांनी शाळेसाठी स्वतःची बसदेखील उपलब्ध करून दिली आहे.

गुणवत्ता वाढीचे परिणाम :

जिल्हा परिषद मिशन आरंभ उपक्रमात शाळेचा निकाल १००%

६ पैकी ३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

२ विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले

शाळेत संगीतमय परिपाठ, वाचन शनिवार, गड-किल्ल्यांच्या सहली, वार्षिक स्नेहसंमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात आला.



शाळेच्या उभारणीत ग्रामस्थ व स्थानिक मान्यवरांचे मोठे योगदान राहिले. भास्करराव ढगे, बबनराव गरड, संतोष ढगे, दत्तात्रय ढगे, मोहन ढगे, रविंद्र ढगे, अरुण ढगे, रामदास दळवी, PSI सुदाम वाळके, मुख्याधिकारी रमेश ढगे, सुरेश चव्हाण, मच्छिंद्र वाळके, जालिंदर ढगे, संदिप वाळके, आनंदराव ढगे, बाबासाहेब ढगे, शरद ढगे, किसन वाळके आदी ग्रामस्थांनी मदत केली. तसेच विस्तार अधिकारी श्री. शिर्के, केंद्रप्रमुख श्री. अरुण फंड व दत्ता कडूस यांचे मार्गदर्शन लाभले.

गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी आणि विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे यांनीही शाळेचा कायापालट व शिक्षकांचे प्रयत्न यांचे कौतुक केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्करराव ढगे म्हणाले, “५ सप्टेंबर रोजी नवनाथ वाळके यांना मिळालेला जिल्हा शिक्षक पुरस्कार हा खरं तर वाळके-पोळ या शिक्षक जोडीने ढगेवाडी शाळेत केलेल्या परिवर्तनाचा व जिद्दीने उभारलेल्या कार्याचा सन्मान आहे.”

पुरस्कार वितरण वेळी बाबर्डी बेंद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनीही गावच्यावातीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नवनाथ वाळके यांचे सत्कार करून अभिनंदन केले. 

*नवनाथ वाळके यांनी रोवला बाबुर्डी बेंद गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; लहुकुमार चोभे यांची सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट..*
माझा बालमित्र, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला, गावकरी, बांध भाऊ, शेती मातीतील  कवी, एक शेतकरी, नवनाथ वाळके यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. नवनाथचा अहमदनगर महाविद्यालयापासून जुळलेला स्नेह भाव आज ३८  वर्षातही तसाच आहे. त्याचा बीड जिल्ह्यात रुजू झाल्यापासूनचा प्रवास पाहत आहे. जे करायचे ते उत्तम, खरवंडी असेल, शेंडी असेल व आता ढगे वाडी.  या पुरस्काराचा तो निश्चित हक्कदार होता. त्याच्या कामाचे या पुरस्काराने चीज झाले म्हणावे लागेल. आमच्या गावातील हा पहिला वाहिला आदर्श पुरस्कार....  नवनाथ वाळके यांनी आदर्श काम करून बाबुर्डी बेंद गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संपूर्ण मित्रपरिवार, नगर तालुका पत्रकार संघ, बाबुर्डीकर परिवाराकडून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, असाच बहरत, फुलत रहा मित्रा.
लहुकुमार चोभे
मा. अध्यक्ष: नगर तालुका पत्रकार संघ




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post