आरोग्य शिबिरे घ्या, रक्तदान, प्लाझ्मा दान करा



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यंदा करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही मातोश्रीवर येऊ नका. त्याऐवजी आरोग्य शिबिरे घ्या, रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक व हितचिंतकांची 'मातोश्री' निवासस्थानी रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आजही शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून वाढदिवस साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

करोना संकटामुळे मी आज वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे कार्यालय किंवा मातोश्री निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जनतेच्या शुभेच्छा मी करोनायोद्ध्यांना समर्पित करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू ये, त्याचप्रमाणे जाहीरात फलकही लावू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post