पारनेरमधील ठस्सन कायम!


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यभर गाजलेल्या पारनेरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष कायम आहे. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोव्हिड सेंटर उभारून साजरा करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार विजय औटी यासाठी सक्रीय झाले आहेत.

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर समेट घडवून हे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले. असे असले तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेचे जुने पदाधिकारी आणि या नगरसेवकांमध्ये मनोमिलन झालेच नाही. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केलेल्या प्रयत्नांनाही फारसे यश आले नाही. या पार्श्वभूमिवर आता दोन्ही पक्ष आपापले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादीतर्फे लंके यांनी दणक्यात साजरा केला. गरजूंना साहित्याचे वाटप केले. यावेळी गर्दी झाल्याने सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याची तमाही बाळगण्यात आली नाही. याशिवाय गेल्या आठवड्यात पारनेर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या मदतीने तालुक्यात ३८ खाटांचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले. यामध्ये आमदार लंके यांचाच पुढाकार होता.

आता शिवसेनेनेही ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून २७ जुलैला पारनेरला ५० बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. पूर्वी केवळ रक्तदान शिबीर घेऊन ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आज कोव्हिड सेंटर उभारण्याची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. मनीषा उंद्रे, डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. लोंढे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सर्व सेवा तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत असतील. याशिवाय १ लाख मास्क व ५० हजार सॅनिटायझरचे वाटपही या दिवशी करण्यात येणार आहे. नियोजितत रक्तदान शिबीरही होणार आहे. काशिनाथ दाते, रामदास भोसले, गणेश शेळके, विकास रोहोकले, अशोक कटारिया, अनिकेत औटी, नितीन शेळके, सुरेश बोरुडे, विजय डोळ, शंकर नगरे, निलेश खोडदे यांनी ही माहिती दिली.

नगरसेवक फोडाफोडीच्या घटनेनंतर आमदार लंके आणखी प्रकाश झोतात आले होते. ते नगरसेवक पुन्हा शिवसेत गेल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ते लंके यांच्यासोबतच आहेत. ठाकरे यांनी लंके यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविल्याची चर्चा पारनेर तालुक्यात असल्याने दोन्ही पक्षांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न लंके यांच्याकडून होत असल्याचे लक्षात आल्यावर तालुक्यातील जुने शिवसैनिक पुढे आले आहेत. त्यांच्यासोबत औटीही आता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post