मुंबई - राज्यात आज दिवसभरात ७ हजार ५४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढत असल्यानं दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.
राज्यात एकीकडे करोनामुक्तांचे प्रमाण वाढत असले तरी रोज करोना रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. काल दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडले होते. आजपर्यंतची ही सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या होती. आजही करोना रुग्णांच्या संख्येनं १० हजार ३२०चा आकडा गाठला आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात २६५ करोनाबाधित रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ हजार ९९४वर पोहोचला आहे. तर एकीकडे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के झाले आहे.
सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Post a Comment