रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अन् अमर्याद गर्दी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि गर्दीची समस्या निर्माण होत आहे. बंगाल चौकी ते मार्केटयार्ड रस्ता तसेच मार्केटयार्डमधील भुसार मार्केटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना संदर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना तिलांजली दिली जात आहे.
एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शहरातील विविध चौकात आणि रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्री करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्या-त्या भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच गर्दी कमी होण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. तथापि सध्या उलट परिस्थिती पहायला मिळत आहे. बंगाल चौकी ते मार्केटयार्ड रस्त्यावर भाजीविक्रेते दोन्ही बाजूने बसत असतात. त्यातच रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठी गर्दी असते. या गर्दीतच अनेक तीन, चार चाकी वाहनचालक आपली वाहने रस्त्यातच उभी करत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी, गर्दी कमी व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणार्‍या नागरिकांना गर्दीत जाण्याची इच्छा नसतानाही वाहतूक कोंडीत अडकनू पडावे लागत आहे. काही बेशिस्त वाहनचालक बेफिकिरी दाखवत असल्याने भाजी विक्रेते, भाजी खरेदीदारांसह इतर नागरिकांना या रस्त्यावर मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या सर्वच नियमांना येथे हरताळ फासला जात आहे.

अशीच परिस्थिती मार्केटयार्ड- मधील भुसार मार्केटमध्ये असून, मालवाहतूक वाहनांसह नागरिकांची येथे मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत नागरिकांना अजूनही फारसे गांभीर्य राहिलेले नसून वाहतूक नियंत्रण करणारे कर्मचारीही बेफिकिर झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post