नगरात कोरोना तपासणीसाठी स्त्राव संकलन केंद्र सुरू



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये तपासणीसाठी होत असलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर नगर महापालिकेने शहरातील नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी स्त्राव संकलन केंद्र सुरू केले आहे. या संकलन केंद्रात दररोज शंभर स्त्राव संकलीत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शहरातील सिव्हील हडकोमधील रामकरण सारडा वस्तीगृहात हे स्त्राव संकलन केंद्र मंगळवारी (दि.7) सकाळ पासून सुरू करण्यात आले आहे.

या संकलन केंद्रात एक डॉक्टर, चार टेक्नीशियन, दोन क्लर्क, एक शिपाई असे कर्मचारी वृंद तैनात असणार आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 असे 12 तास हे केंद्र सुरू राहणार आहे. या ठिकाणी संशयीत नागरिकांचे स्त्राव नमुने घेतल्यानंतर ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले आहेत त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना त्या ठिकाणीच संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी 70 नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर संशयीतांची संख्या वाढल्यास आठरे पाटील पब्लिक स्कूल, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक कॉलेज, दसरे नगर येथील आनंद लॉन या ठिकाणी सुमारे 250 जणांची विलगीकरणाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

या संकलन केंद्राची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. जिल्हा रुग्णालयाकडून मंगळवारी (दि.7) सकाळी स्त्राव घेण्यासाठीचे किटस्, चेंबर व इतर सुविधा प्राप्त झाल्यानंतर हे संकलन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार व नोडल अधिकारी डॉ. सतिश राजूरकर यांनी या संकलन केंद्राची पाहणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post