‘ज्याचा माल त्याचा हमाल’ची अंमलबजावणी करा; अन्यथामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मालाच्या वाहतुकीची वाराई मालवाहतूकदारांकडून वसूल केली जात असल्याने सर्व मालवाहतूक ट्रक मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. बेकायदेशीररित्या वसूल केली जाणारी वाराई थांबविण्याचे निर्देश द्यावेत आणि ‘ज्याचा माल त्याची हमाली’ या शासन नियमाची अंमलबजावणी करावी अन्यथा 1 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा मोटार मालक कल्याणकारी समितीने दिला आहे.

यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सानप, कार्याध्यक्ष करीमभाई हुंडेकरी, रमाकांत गाडे यांनी माहिती दिली. यावेळी भरत ठाणगे, गुरुबिंदरसिंग वाही, रामराव मुनफन, राम कोतकर, उद्धव पवार आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात लागू असलेल्या माथाडी कायद्याअंतर्गत उत्पादित माल व शेती माल याची हाताळणी, जसे गोडावूनमध्ये आवक, मालाचे वर्गीकरण, शेती मालाचे व उत्पादित मालाचे वजन, मापन, बांधाबांध, शिवन व रास अशी कामे अस्थापनेसाठी माथाडी हमाल करत असतात. अशा सर्व कामाचा मोबदला त्या त्या ठिकाणची आस्थापना, मग ते कारखाने असोत विविध गोदामे, व्यापारी दुकाने, सरकारी व खाजगी बंदरे नियमानुसार माथाडी अथवा इतर कामगारांना देत असतात.

देशभरातील सर्वच मालवाहतुकदार सर्व प्रकारच्या मालाची वाहतुक जबादारीने सुरक्षितपणे करीत आहेत. परंतु हे करीत असताना महाराष्ट्रभर सर्वत्र या वाहतुकदारांकडून ‘वाराई’ सदराखाली प्रचंड मोठी रक्कम सार्वत्रिकरित्या वसुल केली जात आहे. सदर ‘वाराई’ आणि माथाडी कामगार कायद्याची परिणामकारक अमंलबजावणी बाबतचे शासनाचे निर्देश आहेत. बेकायदेशीररित्या वसूल केल्या जाणार्‍या ‘वाराई’मुळे होणारे आर्थिक व मानसिक नुकसान या विरोधात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील वाहतूकदारांनी आंदोलने उभी केली होती. आज अहमदनगर जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, वाहतूकदार यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिले आहे.

सदर परिपत्रक आणि इतर अनुषंगिक माहिती आधारे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने आणि श्रीरामपूर मालधक्का व नगर मालधक्का, नगर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समि त्यांना व इतर आस्थापनेमध्ये अशी वसूल केली जाणारी ‘वाराई’ थांबविण्याचे निर्देश द्यावेत. सदर विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोल्हापूर येते कामगार आयुक्त सांगली, कोल्हापूर तसेच साखर कारखानदार प्रतिनिधी, वाहतूकदार आणि व्यापारी उद्योजक यांच्याशी दोन ते तीन वेळा बैठका घेऊन यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. सदर ‘वाराई’ विषयात संपूर्णपणे लक्ष घालून वाहतूकदारांना योग्य तो न्याय द्यावा आणि ‘वाराई’ वसूल संदर्भात सर्व कारखानदार, उद्योजक, व्यापारी, सिमेंट कंपन्या, खत कंपन्या यांना ते थांबविणेबाबत निर्देश द्यावेत.

गरज पडल्यास अशी मिटींग घेण्याबाबतचे निर्देशसुद्धा कामगार आयुक्त यांनी द्यावेत. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ या महाराष्ट्रातीलच नव्हे देशभरातील वाहतूकदारांच्या मागणीवरून महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. युडब्लूए-2015/ प्र.क्र. 218 याचा आधार घेऊन उद्योजक संघटना, मालगोदामे व इतर अस्थापना यांना वाराई संदर्भात योग्य निर्देश द्यावेत. तसेच सर्वच साखर कारखान्यांवर माथाडी कामगार नसताना सुद्धा वाहतूकदारांकडून भराई/ उतराई वाराई वसूल केली जाणारी रक्कम त्वरितबंद होणेबाबत योग्य ऑथारिटीकडून आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post