लग्नसोहळे ‘मंगल’मय ऐवजी ‘संकट’मय!


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत लग्न व इतर काही कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, आरोग्याची काळजी याबाबतचे  नियम पायदळी तुडविले जात आहेत. जिल्हाभरात हा प्रकार सुरू असताना, प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. यामुळे लग्नसोहळे ‘मंगल’मय होण्याऐवजी ‘संकट’मय ठरताना दिसत आहेत.

लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉक सुरू झाल्यानंतर मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स खुली करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पन्नास जणांच्या उपस्थितीत  लग्नसमारंभ व इतर काही धार्मिक कार्यक्रम साजरे केले घेऊ शकतात.लग्न समारंभात आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगसह शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचेे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

काही ठिकाणी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर व हॅण्डवॉश ठेवले जात आहे. मात्र, लग्न सोहळ्यासाठी आलेले ठराविक लोकच त्याचा वापर करतात. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. पूर्वीप्रमाणेच जेवणावळी सुरू आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या निर्देशाचे पालन होत नाही. मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसोहळ्यांची प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाहणी करणे आवश्यक आहे. नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post