‘खासगी’मध्ये वाढतोय कोरोनाचा ‘जोर’!



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. गेल्या 20 दिवसांत ही संख्या तब्बल पाचपटीने वाढलीय. विशेष म्हणजे यात खासगी प्रयोगशाळांमध्ये बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. ही संख्या आढळून आलेल्या एकूण रुग्णांच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. रविवारी आढळून आलेल्या 379 रुग्णांमध्ये ‘खासगी’तील 265 रुग्णांचे समावेश आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज जास्त लोकांची तपासणी होत असल्यानं, हा आकडा जास्त दिसत असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतय. तर, जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणी मोफत होत असली, तरी तिची क्षमता अवघी 300 इतकी असून, ती भविष्यात दररोज 1 हजार इतकी होणार असल्याचं सांगितलं जातंंय. खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणार्‍या कोरोना चाचण्यांसाठी जास्तीत जास्त 2200 रूपये तर, रुग्णाच्या घरी जाऊन स्त्राव घेतल्यास 2800 रूपये इतका दर शासनाने निश्चित केलेला आहे. महापालिकेकडून घेण्यात येणारे लोकांचे स्त्रावही तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेकडेच पाठविले जातायेत. या सर्व बाबींचा विचार करता, यामुळं तर ‘खासगी’मध्ये कोरोनाचा जोर वाढताना दिसत नाही ना, अशी शंका उपस्थित होताना दिसतेय.

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी (दि.1) जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 475 इतकी होती. दि.6 जुलैपासून अ‍ॅन्टीजेन टेस्ट अन् खासगी प्रयोगशाळांतील रुग्णांची नोंदही प्रशासनाने घेण्यास सुरुवात केलीय. प्रशासनाच्याच आकडेवारीनुसार दि.6 ते 25 पर्यंतच्या 20 दिवसांच्या कालावधीत आढळून आलेल्या एकूण 2 हजार 450 रुग्णांमध्ये, खासगी प्रयोगशाळेत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ही तब्बल 1 हजार 268 इतकी आहे. म्हणजेच हा आकडा या कालावधीत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या निम्म्याहून जास्त आहे. गेल्या काही दिवसांतली आकडेवारी पाहता, ‘खासगी’तील एका दिवसाचा आकडा तर थेट 300 पर्यंत पोहचल्याचेही दिसून आलेय. शिवाय त्यामुळं गेल्या 20 दिवसांत रुग्णांची ही संख्या पूर्वीच्या रुग्णांच्या तब्बल पाचपट वाढल्याचे दिसून येतंय. जिल्ह्यातली आतापर्यंतची बाधितांची आकडेवारी पाहता, एकीकडे झपाट्याने रुग्ण वाढत असताना, बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 25 जुलैपर्यंत अवघी 48.23 टक्के इतकीच आहे. रविवारी (दि.26) आतापर्यंत सर्वाधिक 465 इतके उच्चांकी रुग्ण बरे झाल्याने, त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. मात्र, दुसरीकडे नवीन 381 रुग्णांची भर पडल्याने, बाधितांचा एकूण आकडा 3 हजार 449 वर पोहचला आहे. तर मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्याही वीस दिवसांत तिप्पट झालीय.



खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे जादा बिल घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे दस्तुरखुद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितलंय. खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी शासनाने साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी तीन स्तर ठरवून, दर दिवसाला जास्तीत जास्त 4 हजार, 7 हजार 500 व  9 हजार रूपये, अशी दर आकारणी बंधनकारक केलेली आहे. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच अवास्तव शुल्क आकारले जाऊ नये, यासाठी दर पत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही दिलेले आहेत. शिवाय महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेशही दिलेले आहेत.

तसेच सर्व खासगी व धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा आदेशही दिलेला आहे. मात्र, शहरातील रुग्णालये, कोरोना सेंटर येथील उपलब्ध असलेले बेड पाहता, गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना बेड उपलब्ध न झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळं शासनाच्या या आदेशांची खरंच अंमलबजावणी होते का, असा प्रश्‍न आहे. सर्वसामान्य रुग्णांचं हित जपलं जावं, यासाठी शासनाने हे आदेश दिलेले आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या संकटात खासगी रुग्णालयांकडून ‘मेडिक्‍लेम’चा लाभ उठवित, त्यात ‘संधी’ साधली जात नाही ना, याकडेही प्रशासनानं लक्ष ठेवून ‘ऑडिट’च्या माध्यमातून कारवाई करण्याची गरज आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post