मास्क न वापरणारे, गर्दी करणार्यांविरोधात महापालिका व पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी गंभीर दखल घेत गुरुवारी (दि. 23) कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवर बिगर मास्क फिरणारे, दुकानात मास्क न वापरता बसणारे तसेच दुकानात गर्दी करणार्यांविरोधात प्रशासकीय पथकाने दंडाची आकारणी करत कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
तथापि काही नागरिकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 23) महापालिका दक्षता संनियंत्रण पथकाचे अधिकारी शशिकांत नजान, रोहिदास सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मनपा आणि पोलिसांच्या पथकाने शहरात फिरून कारवाईची मोहीम राबविली आहे. त्यानुसार शहरातील बालिकाश्रम रोड, टिळक रोड, वाडियापार्क, पुणे स्टॅण्ड परिसर, इम्पिरियल चौक, वसंत टॉकीज परिसर, जुना बाजार आणि माळीवाडा परिसरात सदर पथकाने आर्थिक दंडाच्या कारवाईची मोहीम राबविली आहे.
मास्क न घालता रस्त्यांवरून फिरणारे तसेच दुकानात म ास्क न वापरता बसणार्यांना आर्थिक दंड ठोठावत कारवाई करण्यात आली. तसेच काही दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावरही या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईच्या मोहिमेत मनपा दक्षता संनियंत्रण पथकाचे अधिकारी शशिकांत नजान, रोहिदास सातपुते, सूर्यभान देवघडे, गणेश लयचेट्टी, भास्कर अकुबत्तीन, नंदू नेमाणे, अमोल लहारे, किशोर जाधव, पो.कॉ. श्रीकांत खताडे, महादेव निमसे आदींचा सहभाग होता.
Post a Comment