नगरच्या ‘आरटीओ’ कार्यालयाचे कामकाज नवीन इमारतीत सुरु


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरासह दक्षिण नगर जिल्ह्यासाठी असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे (’आरटीओ’) कामकाज चांदणी चौकाजवळ सोलापूर रोड परिसरात उभारण्यात आलेल्या प्रशस्त अशा नवीन प्रशासकीय इमारतीत नुकतेच सुरु करण्यात आले आहे. जुन्या कार्यालयाच्या इम ारतीची मोठी दुर्दशा झालेली असल्याने कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना तसेच नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातून आता सर्वांची सुटका झालेली आहे. वाहन परवाना, लायसन, वाहन नोंदणी अशा अनेक आवश्यक कामांसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात यावे लागते.

शहरातून, तसेच दक्षिण जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज हजारो नागरिक येथे येतात; परंतु जुन्या कार्यालयाची अवस्था पाहता, अपुरी जागा, अस्वच्छ परिसर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव, वाहनतळाची अपुरी सोय आणि दलालांचा सुळसुळाट यामुळे आरटीओ कार्यालय असुविधांच्या विळख्यात सापडले होते. नियमित देखभालीअभावी कार्यालयाची, तसेच परिसराची मोठी दुरवस्था झालेली आहे. वाहनांसाठी पार्किंगचीही व्यवस्था तेथे नव्हती. जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जात होती. कार्यालयाबाहेरील रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली जात होती. त्यामुळे बर्‍याचदा नागरिकांना कार्यालयात येतानाही त्रास सहन करावा लागत असे.

कार्यालयाच्या आवारात सगळीकडे अस्ताव्यस्त पार्किंगच दिसत होती. या सर्व अडचणींमधून सुटका होण्यासाठी आरटीओ कार्यालय नवीन प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याची मागणी नेहमी होत होती. त्यामुळे राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी आरटीओ कार्यालयासाठी नवीन इमारतीस मंजुरी दिली. गेल्या 5-6 वर्षांच्या कालखंडानंतर सर्व सोयीसुविधा युक्त प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे उद्घाटन मागील वर्षी ऑगस्ट मध्येच तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनाच्या वेळी इम ारतीमधील फर्निचरची कामे अपूर्ण होती. त्यामुळे तेथे कामकाज सुरु झालेले नव्हते. त्यानंतर फर्निचरची कामे पूर्ण झाली मात्र त्याच वेळी कोरोना महामारीचे संकट आणि त्यामुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने नवीन इमारतीत कामकाज सुरु व्हायला वेळ लागला.

मात्र आता सर्व अडथळे दूर झाल्यावर नुकतेच या ठिकाणी कामकाज सुरु करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ही टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे. प्रशस्त जागेत ही इमारत आहे. येथे वाहनांसाठी टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सध्या जुन्या कार्यालयात दुचाकी, तीन चाकी व चारचाकी छोट्या वाहनांची पासिंग करण्याचे काम केले जात आहे. या व्यतिरिक्त मोठ्या वाहनांची पासिंग तसेच इतर सर्व कामे आता नवीन कार्यालयात सुरू करण्यात आली आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post