कोपरगावातून व्यापार्‍याचे अपहरण



माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - शहराच्या मध्यवस्तीतील गांधी पुतळ्यासमोर असलेल्या बाल गणेश किडस् वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार व कामगार शाफिक उद्दिन शेख या दोघांचे अपहरण करून, दहा लाख रूपयांची खंडणी मागणार्‍या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  ही  घटना शनिवारी (दि.18) रात्री उघडकीस आली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राजेंद्र कुसुंदल उर्फ सावजी (रा. लक्ष्मी नगर कोपरगाव), सचिन संजय साळवे (रा. गजानन नगर, कोपरगाव), आकाश विजय डाके (रा. गोकुळ नगरी कोपरगाव), शुभम केशव राखपसरे (रा. कोर्ट रोड, कोपरगाव) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गांधी पुतळा परिसरातील बाल गणेश किडस् वेअरचे मालक कृष्णा पवार व दुकानातील कामगार शाफिक उद्दिन शेख यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार (क्र.एमएच 12 एन बी 2482) मधून वरील आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली व त्यांच्याकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या पथकाने वरील चार आरोपींना सापळा रचत अटक केली आहे.

या प्रकरणामध्ये आरोपी सचिन राजेंद्र कुसुंदल याने या अगोदरही अनेक बोगस विक्री वाढ योजनांचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची लाखो रुपयांची लूट केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे हे करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post