17 महिन्याच्या कॅन्सरग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रियामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – योगेश रुरल कॅन्सर रिसर्च अॅण्ड रिलिफ सोसायटीच्या गरुड हॉस्पिटल अॅण्ड अहमदनगर कॅन्सर सेंटरमध्ये नुकतेच 17 महिन्यांच्या बालकावर यशस्वी कॅन्सर उपचार करण्यात आले आहेत. अतिशय कमी वयात या बालकाच्या पोटात डाव्या बाजूला किडनीत कॅन्सरची गाठ होती. गरूड हॉस्पिटलमध्ये या गाठीचे निदान करून अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून या मुलाला वेदनामुक्त करण्यात आले. बीड जिल्ह्यातील एका खेडेगावातील असलेल्या या बालकाचे आई-वडील मोलमजुरी करून गुजराण करणारे आहेत. त्यांच्यासाठी या गाठीवरील उपचार खर्च परवडणाराही नव्हता. गरूड हॉस्पिटलमध्ये हे सर्व उपचार मोफत होवून मुलगा बरा झाल्याने त्याच्या आईवडीलांना आनंदाश्रू आवरता आले नाही. त्यांनी डॉ.प्रकाश गरूड यांचा छोटेखानी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

शहरातील नगर- मनमाड रोडवरील डॉ. गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून सेवा कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. डॉ. प्रकाश गरुड हे नामांकित कॅन्सर सर्जन असून मुंबईतील टाटा कॅन्सर हास्पिटलचाही त्यांना अनुभव आहे. या काळात त्यांनी 20 हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवीन जीवन प्रदान केले आहे. गरुड हॉस्पिटलमध्ये नुकतेच 17 महिन्यांच्या कु.साईचरण वाल्मिक उमाप या बालकाला दाखल करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील देठण या गावातील मजुरी करणार्‍या कुटुंबातील साईचरणला लघवीला खूप त्रास होत असल्याने त्याचे पोट सतत दुखत असे. त्याचे पोटही फुगलेले असे. त्याच्या आईवडीलांनी अनेक ठिकाणी त्याला दाखवून उपचार केले. परंतु, त्याचे दुखणे बरे झाले नाही. उपचारांवरील खर्चामुळे त्याचे पालक अतिशय हैराण झाले होते. अखेर साईचरणला उपचारांसाठी नगरमध्ये गरूड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या तपासण्या केल्यावर त्याच्या किडनीत असलेली गाठ कॅन्सरची असल्याचे निदान झाले. डॉ.प्रकाश गरुड यांनी मुलाच्या पालकांना आजाराची संपूर्ण माहिती देवून शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार मुलावर नेफ्रोब्लास्टोमा शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅन्सरतज्ज्ञ डॉ.प्रकाश गरुड, डॉ.निनाद, बालरोग भूलतज्ज्ञ डॉ.ललित जोशी, डॉ.निसार सय्यद, डॉ.सौ.पद्मजा गरुड यांच्या टिमने तसेच ऑपरेशन थिएटरमधील स्टाफने अतिशय गुंतागुंतीची व किचकट अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून मुलाच्या पोटातून जवळजवळ पावणे दोन किलोचा गोळा बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या प्रकृतीत खूपच चांगली सुधारणा असून शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी व रेडिओथेरपी हे सर्व उपचार योजनेंतर्गत मोफत केले जात आहेत. मुलाला अक्षरश: नवीन जीवन मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी साश्रूनयनांनी कॅन्सर सर्जन डॉ. प्रकाश गरुड, डॉ.सौ.पद्मजा गरुड यांचा साईबाबांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post