सरकारने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने पाठिंबा दिला. शुक्रवारी (दि.3 जुलै) महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी ठिकठिकाणी निदर्शने करून कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. नगरमध्ये ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यात राजेंद्र पावसे, शिवाजी पालवे, मंगेश पुंड, शहाजी नरसाळे, नितीन गिरी, अनिल भाकरे, नफीसखान पठाण आदी सहभागी झाले होते.

एकनाथ ढाकणे म्हणाले की, सध्याच्या कोविड 19 च्या महामारीत जीवाची पर्वा न करता सरकारी व कंत्राटी कर्मचारी योद्ध्याप्रमाणे कर्तव्य बजावत आहेत. असे असताना केंद्र व राज्य सरकारची धोरणे कर्मचार्‍यांना दिलासा देणारी असायला हवी. परंतु, सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचार्‍यांनी मे आणि जून महिन्यात विविध सनदशीर मार्गांनी आंदोलन करूनही सरकार जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता जुलैमध्ये पुन्हा एकदा निदर्शनातून लक्ष वेधण्यात आले आहे. पीएफआरडीए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करण्यात यावे, शासकिय- निमशासकीय महामंडळेनगरपालिका-महानगरपालिका, शैक्षणिक संस्था आणि विविध प्रकल्पातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी, कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे वैयक्तिक सुरक्षा उपकरण पी.पी. ई किट मिळावे, विमा कवचास मुदतवाढ मिळावी, मार्चमध्ये कपात केलेले वेतन त्वरित देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा पुढे न ढकलता तो त्वरित मिळावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post