देशभरात 18, 655 लोकांना कोरोनामुळे गमवावे लागले प्राण


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- देशात गेल्या 24 तासांत 22,771 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या संख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय दररोजच्या वाढत्या संख्येपुढे देशातील आरोग्य यंत्रणा कशी पुरी पडणार, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,48,315 इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख 35 हजार 433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख 94 हजार 227 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 442 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात 18,655 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60.72 टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा 1.5 लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 2 लाख 42 हजार 576 नमुना चाचण्या झाल्या असून एकूण 95 लाख 40 हजार 749 चाचण्या करण्यात आल्या.

गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात 6328, तमिळनाडूमध्ये 4343, दिल्ली 2373 रुग्णांची वाढ झाली. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 90 हजारांहून अधिक झाली असून ती 92 हजार 175 वर पोहोचली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post