राज्यातील केंद्रप्रमुखांची एवढी पदे रिक्त!


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - राज्यातील केंद्रप्रमुखांची ४७ टक्के पदे रिक्त आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ११५ पदांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यासाठी २४४ पदे मंजूर आहेत. राज्यातील रिक्त पदे पदोन्नतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण सचिवांकडे केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकूण ८०७ पदे मंजूर असून त्यापैकी ३५८ पदे रिक्त आहेत. त्यात नाशिकसह जळगाव ७४, धुळे २६, नंदुरबार १७ या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी व शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून १९९५ मध्ये केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली. राज्यात एकूण चार हजार ६९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २४०२ पदे रिक्त असल्याचा अहवाल संचालनालयाने जाहीर केला आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने ही पदे सध्याच्या कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून अभावित स्वरूपात भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने परवानगी मागितली आहे.

यापूर्वी राज्यातील केंद्रप्रमुखांची 100 टक्के पदे शिक्षकांमधून भरण्यात येत होती. २०१० मध्ये यातील ४० टक्के पदे सरळसेवा भरतीने, ३० टक्के पदे पदोन्नतीने व उर्वरित ३० टक्के पदे मर्यादित विभागीय परीक्षेतून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला. तथापि सरळसेवेची आणि विभागीय परीक्षेची भरती झाली नाही.

त्यामुळे नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्यांकरता आणि एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याकरता नेमणूक करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदांनी कार्यवाही केली. तथापि यासंदर्भात काही रिट याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने एका केंद्रप्रमुखाकडे २-३ केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याचा परिणाम शैक्षणिक प्रशासन होत असल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखांची भरती करण्यात अनेक अडचणी असल्याची चर्चा आहे. आरंभी या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घ्यावयाचे असल्याने त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर त्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर राज्यात सध्या असलेली बिंदुनामावली पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवरती तात्पुरत्या स्वरूपात या पदांवर कार्यरत शिक्षकांमधून ही पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post